गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पेट्रोलमध्ये थेट पाण्याचीच भेसळ, पेट्रोलपंपाचं गैरकृत्य अखेर उघड

गेल्या काही महिन्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर शंभरीपार पोहोचले आहेत. वाढत्या इंधन दरामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. त्यातच पेट्रोल आणि डिझेलमध्ये भेसळ, गाडीत इंधन भरताना आकड्यांमध्ये फेरफार करणं, इंधनचोरी आदी गैरप्रकार वाढले आहेत.

यामुळे अर्थातच ग्राहकांना दुहेरी फटका सहन करावा लागत आहे. उत्तर प्रदेशातल्या आग्रा इथल्या एका पेट्रोल पंपावर असाच एक गैरप्रकार नुकताच उजेडात आला आहे. या गैरप्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या पंपावर पेट्रोलमध्ये पाण्याची भेसळ केली जात होती आणि असं भेसळयुक्त इंधन ग्राहकांच्या माथी मारलं जात होते. हा प्रकार एका ग्राहकानं उघडकीस आणल्यावर संबंधित पंपाची चौकशी करण्यात आली. याबाबतचं वृत्त ‘अमर उजाला’ने दिलं आहे.

20 ते 30 मिली इंधन जाणीवपूर्वक कमी भरणं, युनिट मशीनमधल्या कार्डात फेरफार करणं, पेट्रोलमध्ये भेसळ करणं, पेट्रोल मशीनच्या पल्सरमध्ये फेरफार करणं असे गैरप्रकार पेट्रोल पंपांवर होत असल्याचं अनेकदा पाहायला मिळतं. यामुळे ग्राहकांना नुकसान सहन करावं लागतं. गेल्या काही महिन्यांत अशा प्रकारचे गैरप्रकार आग्र्यातल्या काही पेट्रोल पंपांवर होत असल्याचं आढळून आलं आहे.

…आणि पेट्रोलपंपाचं गैरकृत्य उघड झालं

प्रतापपुरा इथल्या एचपी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरल्यानंतर गाड्या बंद पडत असल्याची तक्रार अनेकांनी केली होती. नामनेर येथील शाहरूखने त्याच्या मोटारसायकलमध्ये काही दिवसांपूर्वी प्रतापपुरातल्या एचपी पेट्रोल पंपावर 500 रुपयांचं पेट्रोल भरलं होतं. पेट्रोल भरल्यानंतरही त्याची मोटारसायकल सुरू होत नव्हती. त्यानंतर त्याने मोटारसायकल गॅरेजमध्ये नेली. पेट्रोलमध्ये पाण्याची भेसळ असल्याचं तिथे स्पष्ट झालं.

त्यानंतर शाहरुखने पंप चालकाकडे याबाबत तक्रार केली. तेव्हा तिथे नागरिकांची गर्दी झाली. बादली आणि बाटल्यांमधल्या पेट्रोलमध्ये पाण्याची भेसळ असल्याचं आढळून आलं. त्यानंतर नागरिकांनी पंपावर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. याबाबत माहिती मिळताच रकाबगंज पोलीस ठाण्याचे कर्मचारी पंपावर पोहोचले. पोलिसांनी नागरिकांची समजूत काढली; मात्र दुसऱ्या दिवशी या सर्व घटनेचे 5 व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.

आग्र्यात 215 पेट्रोल पंप आहेत. या पंपांची तपासणी करण्यासाठी तीन विभागांचं मिळून एक पथक स्थापन करण्यात येणार आहे. पेट्रोलियम कंपनी, पुरवठा विभाग आणि वजन व मापे विभागाच्या मदतीनं ही तपासणी केली जाणार आहे. याबाबत दोन दिवसांत कारवाई सुरू होईल. भेसळ आणि इंधन चोरी आढळून आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती अन्न आणि पुरवठा विभागाचे एडीएम जय नारायण यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *