

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय तथा गव्हर्मेंट ऑफ गोवा, विज्ञानभारती आणि राष्ट्रीय ध्रुवीय समुद्री अनुसंधान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने गोवा मध्ये ‘इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टीवल २०२१’ आयोजित करण्यात आला होता. या फेस्टीवलला स्वेरीतील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून स्वेरीतील संशोधनाला आणखी गती प्राप्त करून दिली आहे.
या उपक्रमासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातील वेगवेगळ्या भागातून आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ, विद्यार्थी आणि मोठमोठे उद्योजक सहभागी झाले होते. या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये महाराष्ट्रातील केवळ मोजक्याच महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक यांनाच आमंत्रित करण्यात आले होते. त्यापैकी स्वेरीचे रिधम परमार, श्रेयस चव्हाण, सचिन क्षीरसागर व पृथ्वीराज देशमुख हे चार विद्यार्थी व डॉ. प्रवीण ढवळे व प्रा. कुलदीप पुकाळे हे दोन प्राध्यापक यांनी गोव्याच्या फेस्टीवलमध्ये प्रत्यक्षपणे सहभाग नोंदवला. केंद्रीय विज्ञान विभागाच्या वतीने दरवर्षी भरविण्यात येणारा ‘इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल’ यावर्षी गोवा येथे आयोजित करण्यात आला होता. या वर्षी साजरा करण्यात येत असलेल्या ‘आजादी का अमृतमहोत्सव’ या कार्यक्रमामध्ये ‘ग्लोबल इंडियन सायंटिस्ट अँड टेक्नो क्राफ्ट फेस्ट’ या विभागांतर्गत स्वेरीच्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. कोरोना सारख्या महाभयंकर साथीच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलात्मक गुणांमध्ये वाढ होण्याकरिता स्वेरी कॉलेज नेहमीच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत असते. ऑनलाइन शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना प्रत्यक्षपणे अशा मोठ्या परिषदांमध्ये प्रत्यक्षपणे सहभागी करून विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये भर पाडण्यासाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक नेहमीच तत्पर असतात. त्याचाच भाग म्हणून मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थी व प्राध्यापकांची या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी निवड झाली. या परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दि.१० डिसेंबर ते १३ डिसेंबर २०२१ या तीन दिवसाच्या कालावधीत विज्ञान प्रदर्शनाबरोबरच एग्रीकल्चर विभागातील आलेल्या नवीन टेक्नॉलॉजीचे प्रोजेक्ट मोडेल याबाबत महत्वपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना मिळाली. गेल्याच आठवड्यामध्ये या कार्यक्रमाचे निमंत्रक डॉ. यल्लोजीराव मिरजकर व त्यांचे सहकारी डॉ. नंदकुमार यांनी प्रत्यक्षपणे महाविद्यालयात येऊन या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी स्वेरीच्या विद्यार्थ्यांना आमंत्रित केले होते. या सायन्स फेस्टीवल मध्ये स्वेरी अभियांत्रिकीचे शैक्षणिक अधिष्ठाता व सिव्हील इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ.प्रशांत पवार यांनी आर.एच. आर.डी.एफ. मधील ग्रामीण भागातील रोजगाराचे स्त्रोत निर्माण करण्यासाठी गाव पातळीवरील शेतीमधील वेगवेगळ्या भाज्यांसाठी लागणाऱ्या ‘सोलर ड्रायर’ संबंधी महत्वपूर्ण माहिती दिली तर प्रा. कुलदीप पुकाळे यांनी एग्रीकल्चर विभागातील कांदा पेरणी यंत्राबाबत उपयुक्त माहिती दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या तांत्रीक क्षेत्रातील ज्ञानार्जनासाठी स्वेरी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत असल्याने स्वेरीच्या संशोधन कार्यात देखील वाढ होत असल्याचे दिसून येते.