ताज्याघडामोडी

ग्राहक दैत्यो भव : ?

आफ्रिकेत कोरोना नव्या स्वरूपात अवतीर्ण झाला आहे आणि सारे भूमंडळ हादरले आहे.महाराष्ट्राने तर अगदी कठोर sop जारी केल्या आहेत,आणि केंद्र सरकारने त्यावर नाराजी देखील जाहीर केली आहे.

हे भीतीचे वातावरण पाझरत पाझरत आता सोलापूर जिल्ह्यातील प्रशासकीय पातळीवर आले आहे आणि सन्माननीय जिल्हाधिकारी यांनी आदेश काढून आपले कर्तव्य पार पाडले आहे.त्याचेच अनुकरण करत काल आपल्या पंढरपूर नगरपालिकेचे अतिकर्तव्यदक्ष मुख्याधिकारी यांनी देखील तातडीने शहरातील व्यापारी कमिटी,हॉटेल असोशियन आणि इतर व्यापारी आस्थापनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत वरिष्ठाच्या हुकुमाची तामिली केली जावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

सरकारने काढलेल्या आदेशानुसार शहरातील हॉटेल,दुकाने,व्यापारी आस्थापना,शोरूम आदी मध्ये कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस झालेल्या नागिरकांनाच प्रवेश दिला जावा अन्यथा १० हजार दंड आणि वारंवार दोषी आढळला तर ५० हजार दंड असे ते फर्मान आहे.लस अजिबात न घेतलेला,एकच डोस घेतलेले,दुसरा डोस घेण्याचा ८४ दिवसाचा कालावधी पूर्ण न झाल्याने दुसऱ्या डोस पासून वंचित राहिलेले नागिरक जर या दुकानांमध्ये,हॉटेलमध्ये आले आणि पकडले गेले तर त्यांना ५०० पण दुकान मालकाला १० हजार दंड भरावा लागणार आहे.त्यामुळे दुसरा डोस न घेता आलेला ग्राहक हा व्यापाऱ्यांसाठी ग्राहक देवो भवो नाही तर ग्राहक दैत्य भवो याची अनुभूती देऊन जाणार आहे.दुकानदाराचा कुठलाही दोष नसताना.

मुळातच केंद्र शासनाने फेब्रुवारी २०२१ पासून लसीकरण मोहीम सुरु केली ती केवळ ६० वर्षावरील नागरिकांसाठी,पुढे मार्च महिन्या अखेर गंभीर आजार असलेल्या ४५ वर्षांपुढील नागिरकांना लस देण्याचा निर्णय झाला पण लस मिळत कुठे होती ?

लसीचा तुटवडा सुरु झाला आणि केंद्र शासनाने मे २१ मध्ये ४५ पुढील सामान्य नागरिकांसाठी लस देण्याचा निर्णय झाला.तेव्हाही लस मिळणे हि देव भेटल्याची अनुभूती होती.

पुढे जून महिन्यात ३० वर्षावरील कॉमन मॅन लसीसाठी पात्र ठरू लागला पण याच कालावधीत एक निर्णय झाला ८४ दिवसानंतर दुसरा डोस मिळेल.त्यामुळे एप्रिल,मे,जून,आणि जुलै या कालावधीत पहिला डोस घेतलेले नागिरक अडचणीत सापडले.दुसऱ्या डोसच्या प्रतिक्षेचा कालावधी वाढला.आणि याच दरम्यान १८ वर्षावरील वयोगटासाठी लस देण्यास सुरवात झाली पण दुसऱ्या डोसचा कालावधी ८४ दिवसच कायम राहिला.

खऱ्या अर्थाने मुबलक प्रमाणात लस मिळू लागली तरी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यापासुन आणि पहिला डोस घेण्यासाठी गर्दी दिसू लागली.

पण आज पंढरपूर शहर तालुक्याची आकडेवारी पहिली असता एकच डोस झालेल्या नागिरकांची संख्या हि सरासरी ७० टक्के आहे तर दोन्ही डोस झालेल्या नागिरकांची संख्या हि केवळ २३ टक्के आहे.आणि याचाच अर्थ म्हणजे हे दुसरा डोस न घेतलेले ७७ टक्के नागिरक हे घराबाहेर पडून कुठल्याही व्यवसायिक आस्थापना मध्ये गेल्यास आणि नेमके कारवाई साठी आलेले नगर पालिकेचे अथवा पोलीस पथक आल्यास त्या दुकान,हॉटेल,शोरूम मालकास किमान १० हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. 

आपण एकवेळ राज्यकर्त्यासमोर हतबल नसतो कारण ते स्वतःची प्रतिमा जपण्यासाठी थोडातरी जनतेच्या भावनेचा विचार करत असतात पण आपण लोकशाहीत खरे राजे असलेल्या काही प्रशासकीय अधिकाऱ्यांना या बाबत बोलू सुद्धा शकत नाही.आज मी तोच अनुभव घेतला आहे.

त्यामुळे पंढरपूर शहरातील हॉटेल चालक,दुकान मालक,विविध व्यवसायीक आस्थापना चालक मालक यांनी या शहरातील लसीचे दोन्ही डोस न घेतलेल्या ७७ टक्के नागिरकांपैकी कोणी आपल्या दुकानात आला तर नाही ना यासाठी दक्षता घेणे गरजेचे आहे.अन्यथा मोठा दंड भरावा लागेल.आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू आहे,त्या अंतर्गत आलेल्या sop नो चॅलेंज असतात कायद्याच्या दरबारी.

– राजकुमार शहापूरकर

(संपादक : पंढरी वार्ता )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *