कोरोनावर वेगवेगळ्या औषधाने उपचार केले जात आहेत. दोन आठवड्यांपूर्वीच एका कॉकटेल अँटिबॉडीज औषधाला भारतात मान्यता देण्यात आली. कासिरिविमॅब आणि इमदेविमॅब या मोनोक्लोनल अँटिबॉडीने औषधाने कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात आले आणि त्याचे परिणाम आता समोर आले आहेत. दिल्लीतल्या सर गंगाराम रुग्णालयाने याबाबत माहिती दिली आहे.
मोनोक्लोनल अँटिबॉडीने दोन रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहे. पहिल्या सात दिवसांतच त्यांच्यातील लक्षणं वेगाने कमी झाली आणि औषधाचा चांगला परिणाम दिसून आला, असं सर गंगाराम रुग्णालयाने सांगितलं आहे.
36 वर्षाच्या आरोग्य कर्मचाऱ्याला भरपूर ताप, खोकला, अशक्तपणा, स्नायूंमध्ये वेदना होत्या. त्याला आजाराचं निदान झाल्यानंतर सहाव्या दिवशी REGCov2. अवघ्या 12 तासांतच त्याची प्रकृती सुधारली आणि त्याला डिस्चार्ज देण्यात आला, असं रुग्णालया प्रशासनानं सांगितलं.
याआधी हे औषध लाँच झाल्यानंतर 26 मे, 2021 रोजी हरयाणाच्या गुरुग्राममधील मेदांता हॉस्पिटलमधील 84 वर्षीय रुग्णालाही देण्यात आलं होतं.
मेदांता रुग्णालयाचे चेअरमन डॉ. नरेश त्रेहान यांनी एएआयशी बोलताना सांगितलं की, “कोरोना रुग्णाला सुरुवातीच्या टप्प्यात जर हे औषध दिलं तर ते व्हायरला रुग्णाच्या शरीरातील पेशींमध्ये जाण्यापासून रोखतं. परिणामी ज्या रुग्णांच्या शरीरात व्हारसचं प्रमाण जास्त आहे आणि ज्यांना तीव्र संसर्ग होण्याचा धोका जास्त आहे, त्यांच्यामध्ये व्हायरसच्या प्रतिकृती तयार होण्याचं प्रमाण कमी होतं. B.1.617 या व्हेरिएंटवरसुद्धा हे औषध प्रभावी आहे. हे नवं शस्त्र आहे”
रॉशे इंडिया आणि सिप्लानं 24 मे, 202 रोजी भारतात हे औषध लाँच केलं. अमेरिकेनंतर भारतातही याच्या आपात्कालीन वापरास परवानगी मिळाली आहे. सौम्य ते मध्यम लक्षणं असलेल्या कोरोना रुग्णांना हे औषध देण्यास परवानगी देण्यात आली आहे.