गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

८ वर्षीय मुलाला पंख्याला उलटं टांगून बेदम मारहाण

राजस्थानमधील बुंदी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघड झाली आहे. निर्दयी बापाने आपल्या ८ वर्षांच्या मुलासोबत असं काही केलं, की त्याबाबत समजल्यानंतर परिसरातील सर्वांनाच धक्का बसला. छताच्या पंख्याला मुलाला उलटं टांगलं आणि त्याला बेदम मारहाण केली. शाळेने दिलेला गृहपाठ पूर्ण न केल्याने बापाने त्याला मारहाण केली. या घटनेने परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे.

शाळेने दिलेला गृहपाठ पूर्ण न करता, तो मुलगा खेळण्यासाठी घराबाहेर पडला होता. याचा राग आल्याने बापाने त्याला छताच्या पंख्याला उलटे लटकवले आणि मारहाण केली. राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यात घटलेल्या या घटनेने सगळ्यांनाच धक्का बसला. मुलाची पतीच्या तावडीतून सुटका करण्याचे आईने बरेच प्रयत्न केले. तिने बऱ्याचदा पतीला रोखले. पण त्याने काहीही ऐकले नाही. मुलाला त्याने बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ तिने आपल्या मोबाइलमध्ये काढला. त्यानंतर तो सोशल मीडियावर व्हायरल केला.

रिपोर्ट्सनुसार, बुंदी जिल्ह्यातील डाबी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नरोली गावात हा धक्कादायक प्रकार घडला. ही घटना उघडकीस आल्यानंतर बाल अधिकार संरक्षणासाठी स्थापन केलेल्या राजस्थान राज्य समितीने जिल्हा अधीक्षकांना कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. खदानीत काम करणाऱ्या पुष्कर प्रजाप्त याने आपल्या पोटच्या मुलाला मारहाण केल्याचा आरोप आहे.

शाळेने दिलेला गृहपाठ पूर्ण न करता तो खेळायला गेला होता. पुष्करच्या पत्नीने या घटनेचा व्हिडिओ मोबाइलवर काढला आणि चित्तौडमध्ये राहणाऱ्या आपला भाऊ चंद्रभान प्रजाप्त याला पाठवला. त्यानंतर तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. चंद्रभानने व्हिडिओ मिळाल्यानंतर चित्तौड जिल्ह्यातील स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तथापि, ही घटना दुसऱ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे, त्यामुळे या ठिकाणी गुन्हा नोंदवू शकत नाही असे तिथल्या स्थानिक पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले. त्यानंतर चंद्रभान याने चाइल्डलाइन समन्वयक भूपेंद्र सिंह यांच्याशी चर्चा केली. त्यांनी ते प्रकरण बुंदी जिल्ह्यातील शाखेकडे पाठवले. बुंदीच्या चाइल्डलाइन समन्वयकांनी हे प्रकरण डाबी पोलीस ठाण्यात कळवल्यानंतर हे प्रकरण उघड झाले.

या घटनेच्या तपासासाठी मुलाच्या गावात गेल्यानंतर त्यांच्या घराला कुलूप लावलेले होते. त्यामुळे परत यावे लागले. मुलाची आई भेटू न शकल्याने तक्रार दाखल करून घेऊ शकलो नाही, असे डाबी पोलिसांनी सांगितले. व्हायरल व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी चौकशी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *