ताज्याघडामोडी

महाराष्ट्रात राजकीय इतिहासात पक्ष निष्ठेचे असे उदाहरण सापडणार नाही !

मतदानाला केवळ चार दिवस उरले होते,स्व.ऍड.राजाभाऊ पाटील यांच्या प्रचारासाठी कमर्वीर कै.अण्णा आणि त्यांचे काही जेष्ठ सहकारी सोडून सारा अण्णा गट पहिल्यांदाच स्व.अण्णांना दैवत मानत असूनही निवडणुकीच्या राजकारणात त्यांच्या सोबत नव्हता.मा.ब्रम्हदेव माने,विनायकराव पाटील आदी जिल्ह्यातील नेते अण्णांच्या सोबत असायचे पण त्यांनाही आतून काही तरी खटकू लागले होते पण बोलता येत नव्हते.तालुक्यातील गावोवाच्या प्रचार सभा संपवून पंढरपुर शहरात कॉर्नर सभांना सुरुवात झाली होती.स्व.आ.सुधाकरपंत परिचारक हे कॉग्रेसचे उमेदवार होते आणि त्यांनाच विजयी करा म्हणून कै.औदूंबर अण्णा पाटील चौकाचौकात कॉर्नर सभांतून कॉग्रेसची उज्वल परंपरा आणि कॉग्रेसचे नेते शरद पवार यांचं कुशल नेतुत्व याची महती वर्णन करत कॉग्रेसच्या उमेदवारास विजयी करा आणि शरद पवार यांचे हात बळकट करा असे आवाहन मतदारांना करत होते.कै.अण्णांची सभा आहे म्हणून आण्णा गटाचे कार्यकर्ते समर्थक अण्णा काय बोलतात हे ऐकण्यासाठी उत्सुकतेने गर्दी करत होते आणि कॉग्रेस आणि शरद पवार यांच्यावरील निष्ठेपायी अण्णा हे बोलत आहेत यावर ठाम रहात स्व.ऍड.राजाभाऊ पाटील याना मतदान करण्याचा निर्धार कायम ठेवत घरी जात होते. मतदानाच्या ३ दिवसाआधी सायंकाळी ७ वाजता थोरात चौक गोविंदपूरा येथे कै.अण्णांची सभा होती.हा भाग म्हणजे अण्णा गटाचा बालेकिल्ला समजला जात होता.शहरात इतक्या सभा झाल्या पण कै.अण्णांना कोणी सभेत बोलताना अडवले नव्हते आणि तसे कुणाचे धाडसही नव्हते पण या ठिकाणी सभा सुरु झाल्यानंतर ते घडले.१९९१ च्या विधानसभा निवडणुकीवेळी शरद पवार यांनी तुम्हाला उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडले,पुढील वेळी तुमचा विचार करू असे आश्वासन दिले,यावेळी त्यांनी शब्द पाळला नाही मग तुम्ही का आग्रह धरताय असा सवाल त्यांना केला गेला.कै.अण्णांनी शांतपणे उत्तर दिले,मी कॉग्रेसचा जिल्हाध्यक्ष आहे.१८ वर्षे आमदार राहिलो आहे.मी सभांमधून माझी भूमिका मांडत आहे.ज्यांना पटतंय ते अनुभवी माणसे सोबत आहेत.मी माझ्या विचाराने चालतोय.
या निवडणुकीत स्व.ऍड.राजाभाऊ पाटील यांचा थोडक्या मतांनी पराभव झाला.अण्णा गटातील तरुणाई प्रचंड अस्वस्थ झाली.काहीजण तर थेट कै.अण्णांना भेटून उघडपणे नाराजी व्यक्त करू लागले पण कै.अण्णांनी एकच वाक्यात विषय संपवला होता,कै.देविदास भाऊ,कै.पुरवत,कै,वसंतदादा,नारायण मर्दा आदी समोर होते आणि देगाव येथील एक युवा कार्यकर्ता हमहमसून पराभवाचे शल्य सांगत शरद पवार यांच्या विषयी दोन शब्द बोलून गेला.त्यावेळी मात्र अण्णांनी एकच निक्षून सांगितले.तुमची पोराठोरांची इच्छा होती निवडणूक लढवली,आम्ही लांबचा विचार करतो,माझे जिथे नडेल तिथं पवार साहेब पाठीशी असतील.
पुढे १९९६ ला कै.अण्णा अडचणीत आले पण कॉग्रेसचे नेते मदतीसाठी धावले ना ज्यांच्या एका इशाऱ्यावर सारे काही थांबले असते ते शरद पवार.
१९९१ पासून मी राजकरणात सक्रिय होतो.लहान वयात मोठं मोठ्या गप्पा मारणारा नवयुवक आणि विठ्ठल मेंबरचा पोरगा म्हणून कै.आण्णाही मला चांगलेच ओळखत होते.१९९५ च्या निवडणुकीत मतदानाच्या आदल्या दिवशी अतिशय महत्वपूर्ण असणारी स्लिपा ”वाटप”जबाबदारी मी स्वतः,शेखर मंगेडकर,आणि स्व.संजय फाटे यांच्यावर पांडुरंग ताठे यांनी सोपवली होती आणि आम्ही चिंचबन तालमीच्या बोळात स्लिपा ”वाटप” करत होतो पण प्रतिपक्षाला सुगावा लागला आणि कै.मोहन मिसाळ,वसंत जवंजाळ,पांडुरंग घंटी मेंबर,मारुती संगीतराव आदी प्रतिपक्षाच्या कार्यकर्तांनी आम्हाला तिघाला स्लिप ”वाटप” करत असताना ट्रॅप केले.पोलीस दरबारी फोन झाला तातडीने गाडी आली.अंगझडती झाली,गोंधळ झाला आणि बनियन अंडरवेअर वर आमची स्वारी पोलीस ठाण्यात दाखल झाले.पुढे तिथे दोन्ही बाजूने बराच खल झाला आणि आम्ही तुमच्या स्लिपा ”वाटताना”कुठे अडवले नाही तुम्ही आमच्या स्लिपा ”वाटप” करताना अडवू नका यावर ”सखोल” मंथन झाले होते.निकाल झाल्यानंतर आम्ही तिघांनीही कै.अण्णांना भेटावयाचे ठरवले आपणही नाराजी व्यक्त करू म्हणून.पण आमचे धाडस होत नव्हते. त्यामुळे आम्ही स्व.राजाभाऊ पाटील यांना भेटलो आणि आमची नाराजी प्रकट केली.कारण त्यांच्या समोर आम्ही मोकळे पणाने बोलू शकत होतो.
आम्ही आमच्या मनाची समजूत काढली,शरद पवार यांच्यावर नेता म्हणून अण्णांची प्रचंड निष्ठा आहे.त्यांनी शब्द दिलता,त्यांनी पाळला.
पण पुढे वर्षभरातच स्वकीयांकडून जे काही घडले ते दुःख कै.अण्णांना पारंपरिक विरोधकांनीही कधी दिले नव्हते.आणि खरे म्हटले तर इथूनच मी सक्रिय राजकारणास रामराम ठोकला अगदी तरुण वयात.
पण मी एवढे ठामपणे सांगू शकतो कि पक्षाशी,पक्ष नेतृत्वाशी निष्ठा बाळगून पोटच्या पोरा विरोधात देखील प्रचार सभा घेत शेतकरी,कष्टकरी यांच्या हितासाठी राज्यात कॉग्रेसची सत्ता आणि शरद पवार यांचे नेतृत्व कसे गरजेचे आहे हे ठणकावून सांगणारे नेत्तृव राज्यात यापूर्वी कुठे आढळले होते ना भविष्यात कुठे आढळेल याची याची शक्यता नाही.
कै.औदूंबरअण्णांचा सहवास अगदी तरुण वयात आम्हाला लाभला हे आमचे परम भाग्य आहे आणि त्या आठवणी मी आत्मीयतेने जोपासल्या आहेत गेल्या १४ वर्षात निष्पक्ष पत्रकारिता करत असताना.
– राजकुमार शहापूरकर
(संपादक -पंढरी वार्ता )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *