ताज्याघडामोडी

गांजाची ऑनलाईन डिलिव्हरी,अ‍ॅमेझॉनच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

ऑनलाइन माध्यमातून गांजा पुरवल्याबद्दल अ‍ॅमेझॉनच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्यप्रदेशातल्या पोलिसांनी १४ नोव्हेंबर रोजी दोघांना २० किलो गांजासह ताब्यात घेतलं होतं.त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की हे लोक अ‍ॅमेझॉन वेबसाईटचा वापर गांजा खरेदी आणि पुरवठा करण्यासाठी करत होते.

आपल्या निवेदनात मध्यप्रदेश पोलिसांनी म्हटलं आहे की अ‍ॅमेझॉन इंडियाच्या काही कार्यकारी संचालकांवर NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणाची चौकशी कंपनीकडे केली असता त्यांनी सादर केलेली कागदपत्रं आणि दिलेली उत्तरं यात तफावत आढळून आल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

किती संचालकांवर कारवाई झाली याबाबतची माहिती मात्र पोलिसांनी दिलेली नाही. रॉयटर्स या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने याविषयीचं वृत्त दिलं आहे.

पोलिसांनी या आधीही या संचालकांशी गांजा तस्करीविषयी चौकशी केली होती. पोलिसांचा अंदाज आहे की साधारण एक लाख ४८ हजार कोटी डॉलर्स किमतीचा एक हजार किलो गांजा आत्तापर्यंत अ‍ॅमेझॉनच्या माध्यमातून विकला गेला आहे.

मात्र अ‍ॅमेझॉनने आपल्यावरील आरोप फेटाळले असून आपल्या निवेदनात म्हटलं आहे की ज्या वस्तूंच्या अथवा पदार्थांच्या विक्रीवर कायदेशीर बंदी आहे, त्यांच्या विक्रीला आम्ही परवानगी दिलेली नाही. त्याचबरोबर या प्रकरणातल्या विक्रेत्यांवर आपल्या बाजूनेही कडक कारवाई केली जाईल, असं अ‍ॅमेझॉनने म्हटलं आहे. आमच्याकडे याविषयीची माहिती आलेली आहे आणि आम्ही त्याचा तपास करत आहोत, असं अ‍ॅमेझॉनने म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *