गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पत्नीवर वारंवार संशय घेणाऱ्या पतीची हत्या; डॉक्टरच्या चिठ्ठीमुळे ४८ तासांत हत्येचा उलगडा

कांबेगाव येथे अरमान शाह (३५) याच्या हत्येचा अखेर उलगडा झाला आहे. अरमानच्या परिचयाच्या मोहम्मद सलमान शेख (२७), तस्लीम अन्सारी (३०) आणि चांदबाबु अन्सारी (२६) यांनी अरमान हा त्याच्या पत्नीवर वारंवार संशय घेत असल्याने त्याचा खून केल्याचे निजामपूरा पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. डॉक्टरच्या अर्धवट फाटलेल्या चिठ्ठीच्या आधारे अवघ्या ४८ तासांत पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला आहे.

भिवंडी येथील कांबेगाव येथील रुपाला पूलाखाली २० जानेवारीला एका गोणीमध्ये काहीतरी बांधून ठेवल्याचे स्थानिक रहिवाशांना आढळून आले होते. तसेच ही गोणीही संपूर्ण रक्ताने माखलेल्या अवस्थेत होती. त्यामुळे स्थानिकांनी तात्काळ याची माहिती निजामपूरा पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गोणी उघडली असता या गोणीत एक मृतदेह आढळून आला.

तसेच मृताच्या गळ्याभोवती, छातीवर आणि डोक्यावर जखमा आढळून आल्या होत्या. ही हत्या असल्याचे पोलिसांना लक्षात आल्यानंतर याप्रकरणी निजामपूरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांना मृताची ओळख पटविणे तसेच आरोपींना पकडण्याचे दुहेरी काम होते.

उपायुक्त योगेश चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत ढोले यांच्या मार्गर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांनी याप्रकरणाच्या तपासासाठी दोन पथके तयार केली. पोलिसांनी मृतदेहाच्या पँटचा खिसा तपासला असता त्यामध्ये पोलिसांना अर्धवट फाटलेली डॉक्टरच्या हस्ताक्षरातील चिठ्ठी आढळून आली.

तसेच मृताच्या शरिरावर मणी बनविण्यासाठी लागणारा रंगही आढळून आला. पोलिसांनी भिवंडी शहरातील मणी बनविण्याचे १०० कारखाने तपासले. त्याठिकाणी कोणी कामगार गैरहजर असल्याची माहिती काढण्यास सुरूवात केली. पण ठोस असे हाती लागत नव्हते. त्यानंतर पथकाने डाक्टरांच्या हस्ताक्षरातील चिठ्ठी शहरातील सर्व औषधालय मालकांना दाखविण्यास सुरूवात केली.

त्यावेळी हे हस्ताक्षर खान कंपाऊंड भागातील एका डॉक्टरची असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी डॉक्टरचा पत्ता शोधून काढला. पण रुग्ण अधिक असल्याने ही चिठ्ठी कोणत्या रुग्णास दिली होती याची माहिती डॉक्टरला सांगणे कठीण जात होते. पोलिसांनी गेल्या दोन दिवसांपासून याच परिसरातील कोणी गायब आहे का, याचा शोध घेतला.

त्यावेळी एक महिला तिच्या पतीला शोधत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पथकाने या महिलेला गाठून तिला आणि तिच्या मुलाला मृताचे छायाचित्र दाखविले. मृतदेहाचा चेहरा सुजलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे तिला ओळखता आले नाही. तर तिच्या मुलाने चेहऱ्यावरील तिळावरून हा त्याच्या वडिलांचा मृतदेह असल्याचे सांगितले. त्याचवेळी मोहम्मद सलमान नावाचा एक व्यक्ती हा खून त्याच्या समोर झाल्याचे पोलिसांना सांगू लागला.

पोलिसांना त्याचा संशय येऊ लागल्याने त्याची चौकशी केली. मोहम्मद सलमानने गुन्ह्याची कबूली दिली. त्याच्या इतर दोन साथिदारांच्या मदतीने त्याने हा खून केल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर पोलिसांनी तस्लीम आणि चांदबाबू या दोघांनीही उत्तरप्रदेशात पळून जाण्यापूर्वी अटक केली.

अरमान याची पत्नी आणि आरोपी मणी कारखान्यात कामाला होते. पत्नी तस्लीमशी वारंवार बोलत असल्याने अरमान आणि त्याच्या पत्नीमध्ये मतभेद होत असे. त्यामुळे २० जानेवारीला तस्लीमने अरमानला कारखान्यात बोलावून त्याच्या डोक्यात, छातीत आणि गळ्यावर लोखंडी रॉडने वार करून त्याचा खून केला. त्यानंतर मृतदेह गोणीत भरून कांबेगाव येथे फेकून दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *