गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

राष्ट्रवादी युवती काँग्रेसची पदाधिकारीच निघाली दुचाकी चोरीतील आरोपी

वाहनचोरांमुळे त्रस्त असलेल्या चंद्रपूर शहरामध्ये एक धक्कादायक माहिती उघड झाली आहे. चंद्रपूरच्या स्थानिक गुन्हे शाखेने वाहनचोरांच्या एका टोळीला अटक केली आहे.या टोळींमध्ये तरुणांबरोबर एका तरुणीचाही समावेश आहे. ही तरुणी राष्ट्रवादी युवती काँग्रेसशी संबंधित असल्याची माहिती यामध्ये स्पष्ट झाली आहे.

अटक झालेल्या या युवतीचे नाव वैष्णवी देवतळे असे आहे. ती आपल्या दोन साथीदारांसह वाहनांची चोरी करायची असं पोलिसांनी जाहीर केलेल्या माहितीमध्ये म्हटलं आहे.या युवतीला राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या महिन्यातच निलंबित केले होते असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रपूरचे जिल्ह्याध्यक्ष राजीव कक्कड यांनी केला आहे.

या गुन्ह्याची शंका कशी आली याबद्दल माहिती देताना चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनी जितेंद्र बोबडे बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, “एक व्यक्ती संशयास्पदरित्या दुचाकीची विक्री करत असल्याची माहिती आम्हाला मिळाली. म्हणजेच 50 ते 70 हजार रुपयांची दुचाकी 5 ते 10 हजार रुपयांमध्ये विकत असल्याचे आम्हाला समजले. त्यानंतर त्या व्यक्तीला पकडल्यावर ही माहिती उघड झाली. यातील वैष्णवी देवतळे ही आरोपी राष्ट्रवादी युवती काँग्रेसची पदाधिकारी असल्याचं स्पष्ट झालं.”

मुख्य आरोपीला पकडल्यानंतर त्याने आपण कशी चोरी करायचो हे सांगितले.

अशी करायची चोरी?

हे दोघे एखादी दुचाकी ठेवणाऱ्या इसमावर लक्ष ठेवत. त्यानंतर आरोपी आणि त्याची मैत्रीण ती दुचाकी गाडी धक्का मारून थोडे दूर नेत असत.चोरीच्या दुचाकीवर त्याची मैत्रीण स्वतः बसत असे व तिचा सहकारी आरोपी त्याच्या गाडीने त्या चोरलेल्या दुचाकीला धक्का मारून (टोईंग करून) नेत असत.

तेथे त्यांचा तिसरा साथीदार चोरीच्या गाड्यांचे नंबर प्लेट बदलून व दुचाकीच्या खोट्या किल्ल्या तयार करून देत असे. त्यानंतर या गाड्या विकल्या जात.नंबरप्लेट तयार करण्यासाठी दुसऱ्या एखाद्या दुचाकीचा आधार घ्यायचे. म्हणजेच एखाद्या कंपनीची पांढरी दुचाकी चोरली की त्याच कंपनीच्या दुसऱ्या एका पांढऱ्या दुचाकीचा नंबर या चोरलेल्या दुचाकीला द्यायचे अशी माहिती सपोनी जितेंद्र बोबडे यांनी दिली.

या गुन्हयात आरोपींकडून रामनगर पोलीस स्थानक येथील एकूण 5 गाडया चंद्रपूर शहर पोलीस स्थान येथील 3 गाड्या, बल्लारशा पोलीस स्थानक येथील 1 गाडी तसेच इतर 2 दुचाकी वाहन अशा एकूण 11 दुचाकी मोपेड गाड्या अंदाजे किंमत एकूण 6,30,000/- रू. चा माल हस्तगत करण्यात आलेला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, अतुल कुलकर्णी, चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, सपोनी जितेन्द्र बोबडे, पो.उप नि. सचिन गदादे, पो. हवा. संजय आतकुलवार, पो. कॉ. नितीन रायपूरे, गोपाल आतकूलवार, कुंदन बावरी, प्रांजल झिलपे, रविंद्र पंधरे, म.पो. शि. अपर्णा मानकर यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *