गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

ओढ्यात आढळले तीन मुलींचे मृतदेह; कुटुंबीयांना आहे ‘हा’ संशय

मिरज तालुक्यातील टाकळी येथे जुना मालगाव रस्ता परिसरातील मळलेवाडी ओढ्यात एक तरुणी, एक १६ वर्षीय मुलगी आणि एका बालिकेचा मृतदेह आढळला.

शुक्रवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. नंदिनी देवा काळे (वय १६), मेघा चव्हाण काळे (वय १८) आणि स्वप्नाली टवळ्या पवार (वय ६, सर्व रा. पारधी वस्ती, आंबेडकर नगर, टाकळी) अशी मृतांची नावे आहेत. या तिघांचाही बुडून मृत्यू झाला की काही घातपात आहे, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. दरम्यान, तीन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने पारधी वस्तीवर शोककळा पसरली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पारधी वस्तीवरील नंदिनी काळे, मेघा काळे, स्वप्नाली पवार या तिघी शुक्रवारी दुपारी ओढ्यावर गेल्या होत्या. बराच वेळ होऊनही त्या परत न आल्याने नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला. यावेळी ओढ्याच्या काठावर तिघींचे चप्पल, कपडे मिळाले.

तिघी पाण्यात बुडाल्याची शंका आल्याने परिसरातील नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सामाजिक कार्यकर्ते नागेश कोलप, अंकुश वाघमारे, विजूत भोसले यांच्या मदतीने पाण्यात शोधकार्य सुरू केले. ओढ्यात सुमारे १५ फूट खोल पाण्यात काटेरी झुडूपांचा गळ तयार करून शोधकार्य करण्यात आले. यावेळी तीन ठिकाणी टाकलेल्या गळाला तिघींचे मृतदेह लागले.

तिन्ही मृतदेह बाहेर काढून पोलिसांनी शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत. पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेंदरे आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी या घटनेची सखोल माहिती घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. मुलींचे मृतदेह पाहून पारधी कुटुंबांनी प्रचंड आक्रोश केला. आमच्या पोरींना कुणीतरी मारून टाकलं, असा संताप महिला व्यक्त करत होत्या. दरम्यान, तिन्ही मुलींचा बुडून मृत्यू झाला, की घातपात झाला? याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *