ताज्याघडामोडी

अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयात 10 जणांचा आगीमध्ये होरपळून मृत्यू

अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयूममध्ये ऐन दिवाळीत भीषण आग लागली आहे. 10 जणांचा या आगीमध्ये होरपळून मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिली आहे. जेव्हा ही घटना घडली, तेव्हा 17 रुग्ण आयसीयूमध्ये उपचार घेत होते. त्यापैकी 10 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे, तर सात जण भाजले असल्याचे भोसले यांनी सांगितले आहे.

प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे यावेळी भोसले यांनी सांगितले. आगीत मृत्यू झालेले सर्व रुग्ण कोरोनावर उपचार घेत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अग्निशमन दल या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले होते. युद्धपातळीवर अग्निशामन दलाने कार्य करत तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवले. ही आग एवढी भीषण होती की संपूर्ण रुग्णालयात धुराचे लोट पसरले होते.

या भीषण आगीचे फोटोज आणि व्हिडीओ समोर आले असून ते पाहून ही आग किती भीषण होती, याचा अंदाज वर्तवला जाऊ शकतो. कोरोनापासून वाचण्यासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांचा आगीने होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे आयसीयूला आग लागल्याचे समजताच तातडीने कोल्हापूरवरुन रवाना झाले आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयाला लागलेल्या आगीत काही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. मृतांचा आकडा अद्याप समोर आलेला नाही. प्रत्यक्षात गेल्यानंतर पाहणी करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

शॉर्ट सर्किटने आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाल्याचे हसन मुश्रीफ यांनी सांगितले. मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना तातडीने सरकारी मदत दिली जाईल. तसेच याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई होईल, असेही पालकमंत्री म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *