ताज्याघडामोडी

अनिल देशमुखांना मोठा झटका, न्यायालयाने 6 नोव्हेंबरपर्यंत ED कोठडी सुनावल्याने दिवाळी कारागृहातच

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना रात्री ईडीने अटक केल्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने अनिल देशमुख यांना 6 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांची दिवाळी कारागृहातच होणार आहे.

ईडीच्या वकिलांनी अनिल देशमुख यांची 14 दिवसांची कोठडी मिळावी अशी मागणी न्यायालयात केली होती. त्यानंतर दोन्ही बाजुंकडून झालेल्या युक्तीवादानंतर न्यायालयाने आपला निर्णय सुनावला आहे.

100 कोटी वसुली आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली आहे. 13 तासांच्या चौकशीनंतर ईडीने अटकेची कारवाई केली आहे. या कारवाईमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

100 कोटी वसुलीप्रकरणी आरोप असलेले अनिल देशमुख अनेक दिवसांपासून गायब होते. अनिल देशमुख यांना 5 वेळा समन्स बजावल्यानंतरही ईडीसमोर हजर राहिले नव्हते. त्यामुळे त्यांना त्यांच्या नावानं लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं होतं. तसंच देशमुख यांचा शोध घेण्यासाठी ईडीकडून सीबीआयकडे मदत मागण्यात आली होती. अखेर 1 नोव्हेबर रोजी अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले. सकाळी 11 वाजेच्या सुमारास अनिल देशमुख ईडी कार्यालयात पोहोचले होते. त्यानंतर जवळपास 12 तासांच्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली आहे.

काय आहे प्रकरण?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्याकडून 100 कोटींची वसुली केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी ईडीने तपास करत अनिल देशमुख यांच्या घर आणि कार्यालयावर छापे टाकले होते.

ईडीच्या अटकेची कारवाई टाळण्यासाठी देशमुख यांनी मुंबई हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. पण, कोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली होती. अखेर अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले आणि चौकशीअंती अटकेची कारवाई झाली.

यापूर्वीच अनिल देशमुख यांच्या दोन्ही पीएला ईडीने अटक केली आहे. ईडीनं ही कारवाई केली आहे. कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे अशी दोन्ही पीएची नावं आहेत. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही अटक करण्यात आली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *