ताज्याघडामोडी

शिवसेनेच्या मंत्र्याचे twitter अकाऊंट हॅक, परदेशी व्यक्तीचा झळकला फोटो!

शिवसेनेचे फायरब्रँड नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे ट्वीटर अज्ञात व्यक्तीने हॅक केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे.

गुलाबराव पाटील यांचे ट्विटरवर हे अधिकृत अकाऊंट आहे. याच अधिकृत ट्विटर अकाऊंटवर ते नेहमी ट्विट करत असतात. हे अकाऊंट व्हेरीफाईड देखील आहे. मात्र, गेल्या काही तासांपासून त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर संशयास्पद बाबी आढळून आल्या आहेत. यातील सर्वात लक्षणीय बाब म्हणजे, त्यांच्या अकाऊंटची आधी सर्वांसाठी खुली असणारी टाईमलाईन ही प्रोटेक्टेड करण्यात आली आहे.

यामुळे कुणीही आता त्यांची टाईमलाईन पाहू शकत नाही. यासोबत त्यांच्या प्रोफाईलवरील गुलाबराव पाटील यांचा फोटो बदलण्यात आलेला आहे. त्यांच्या जागी दुसर्‍याचाच एका परदेशी इसमाचा फोटो टाकण्यात आलेला आहे. परंतु, पाटील यांच्या ट्विटर अकाऊंटवरून अजूनपर्यंत कोणतेही संशयास्पद ट्विट करण्यात आलेले नाही.

याबाबत गुलाबराव पाटील यांनी स्वतः सोमवारी रात्री पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे. सायबर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, शिवसेना नेते तथा राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिल्याची मला न्यूज चॅनलच्या माध्यमातून माहिती मिळाली आहे. या प्रकरणाची चौकशी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार सुरू झाली आहे. चौकशीत काय निष्पन्न होईल, त्यानुसार कारवाई होईल, असं गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *