ताज्याघडामोडी

मागविला मोबाइल, आला फक्‍त चार्जर;ऍमेझॉन कंपनीवर गुन्हा दाखल

एका व्यक्तीने ऍमेझॉन कंपनीकडून ऑनलाइन माध्यमातून मोबाइल खरेदी केला. मात्र पार्सलमध्ये केवळ चार्जर आणि केबलच ग्राहकाला मिळाली. हा प्रकार हिंजवडी येथे घडला.

विपुल विनोद पाटणी (वय 33, रा. फेज 1, हिंजवडी) यांनी याप्रकरणी मंगळवारी (दि. 28) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ऍमेझॉन कंपनी, डिलिव्हरी देणारे कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 406, 420 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांनी 14 सप्टेंबर रोजी 14 हजार 499 रुपयांचा मोबाइल ऑर्डर केला. मोबाइलची डिलिव्हरी पाटणी यांना 10 सप्टेंबर रोजी मिळाली. डिलिव्हरी मिळाल्यानंतर पाटणी यांनी मोबाइलचा बॉक्‍स न उघडता तसाच ठेवला.

काही वेळानंतर पाटणी यांच्या पत्नीने बॉक्‍स उघडला असता त्यामध्ये केवळ मोबाइल चार्जर व केबल तसेच इतर डॉक्‍युमेंट असल्याचे दिसले. फिर्यादी यांनी मोबाइल मिळाला नसल्याबाबत ऍमेझॉन कंपनीला संपर्क केला. कंपनीने या प्रकरणाचा तपास करून कळवतो, असे सांगितले. प्रकरणी पाटणी यांनी थेट ऍमेझॉन कंपनी आणि डिलिव्हरी देणारे अधिकारी व कर्मचारी यांच्या विरोधात फिर्याद दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *