Uncategorized

वाळूचा टिपर सोडून देण्यासाठी ५० हजाराची मागणी

राज्यात अवैध वाळू चोरांनी उच्छाद मांडला असून अनेक ठिकाणी राजकीय पाठबळ तर अनेक ठिकाणी पोलिसांच्या हफ्तेखोरीमुळे अवैध वाळू उपसा करणारे वाळू माफिया राजरोसपणे वाळू उपसा करताना दिसतात.चुकून माकून कारवाई झालीच तर पोलीस ठाण्यातून वाहन कसे सोडवायचे याचे सारे तंत्रही त्यांना अवगत झाले आहे अशीही चर्चा होताना दिसून येते.तर बऱ्याच वेळा वाळू वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी कारवाई करत ताब्यात घेतल्यानंतर लाचेच्या रकमेवरुन बिनसते आणि प्रकरण जाते ते थेट लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या ताब्यात.
       असाच काहीसा प्रकार बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस नाईक आणि त्याच्या एका सहकाऱ्यावर लाचलुचपत विभागाने केलेल्या करवाईत उघड झाला आहे.वाळू वाहतूक करणारा टिपर सोडविण्यासाठी ५० हजाराची मागणी करत ३५ हजार रुपये रक्कम स्वीकारताना देऊळगाव राजा पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक संजय चवरे व त्याचा सहकारी खाजगी इसम सोनू शिगणे याला रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
     या घटनेमुळे वाळू माफिया आणि भ्रष्ट पोलीस कर्मचारी यांच्यात कशा प्रकारे आर्थिक व्यवहार होतो हेही दिसून आले असून लाच लुचपत विभागाकडून करण्यात येणाऱ्या कारवायात पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या मोठी असल्याने अशा लाचखोर कर्मचाऱ्यांमुळे महाराष्ट्र पोलीस दलाची बदनामी होत आहे.     

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *