Uncategorized

तरुणीचा विनयभंग

संगमनेरातील सिद्धकला आयुर्वेद महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका 26 वर्षीय तरुणीने महाविद्यालयातील डॉक्टर निमिष सराफ याच्या विरोधात महिलेला लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारचे कृत्य केल्याचा ठपका ठेवीत तक्रार दाखल केली आहे. त्यावरुन शहर पोलिसांनी डॉक्टर सराफ याच्याविरोधात विनयभंगासह भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या वृत्ताने जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

संगमनेर खुर्द शिवारात असलेल्या सिद्धकला आयुर्वेद महाविद्यालयात गेल्या मे महिन्यापासून ते 11 ऑक्टोबरपर्यंतच्या कालावधीत सिद्धकला रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात सदरचा प्रकार घडला आहे. याबाबत याच महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या मुंबईतील एका 26 वर्षीय तरुणीने संगमनेर शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार वरील कालावधीत वेळोवेळी रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात कार्यरत असताना कोणतेही कारण नसताना डॉक्टर सराफ याने या तरुणीला अश्‍लील टोमणे मारुन तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य वारंवार केले. यादरम्यान त्याने सदर तरुणीला शिवीगाळ व मारहाण केल्याचेही दाखल झालेल्या तक्रारीत म्हटले आहे.

तरुणीने संगमनेर शहर पोलिस ठाण्यात स्वतः उपस्थित राहून पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्यासमोर घडला प्रकार कथन केला. त्यावरुन सदर तरुणीची तक्रार दाखल करुन घेत त्यांनी सिद्धकला आयुर्वेद महाविद्यालयातील डॉक्टर निमिष सराफ याच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 354, 509, 504 व 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *