ताज्याघडामोडी

10 मिनिटात दीड लिटर कोल्ड ड्रिंक प्यायला; सहा तासात मृत्यू

कोल्ड ड्रिंक आरोग्यासाठी घातक असल्याचे अनेकदा सांगण्यात येते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत अनेकजण कोल्ड ड्रिंक घेतात. मात्र, अतिप्रमाणात कोल्ड ड्रिंक घेणे एका तरुणाच्या जीवावर बेतले आहे.

वाढत्या उष्णतेने त्रस्त झालेल्या एका 22 वर्षांच्या तरुणाने 10 मिनिटात तब्बल दीड लिटर कोल्ड ड्रिंक घेतले. त्यानंतर सहा तासातच त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना चीनमध्ये घडली आहे. ‘डेली मेल’ने याबाबतचे वृत्त दिले आहे.

वाढत्या उष्णतेपासून दिलासा मिळावा म्हणून एका तरुणाने 10 मिनिटात दीड लिटरची कोल्ड ट्रिंकची बाटली रिचवली. त्यानंतर त्याला उष्णतेपासून दिलासा मिळाला. त्यानंतर सहा तासांनी त्याला पोटदुखीचा त्रास सुरू झाला आणि अंगावर सूज आली. त्रास असह्य झाल्याने त्याला बिजिंगमधील चाओयांग रुग्णालयात दाखल करण्यात आले.

डॉक्टरांनी तपासणी केली असता त्याची प्रकृती चिंताजनक होती. त्याच्या हृदयाची गती वाढली होती. तसेच रक्तदाब कमी झाला होता. त्याला श्वास घेण्यासही त्रास होत होता. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 10 मिनिटात दीड लिटर कोल्ड ड्रिंक घेतल्यानेच तरुणाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.

एवढ्या मोठ्या प्रमाणात कोल्ड ड्रिंक घेतल्याने शरीरात न्यूमेटोसिसचा त्रास होतो. तसेच अतिशय वेगाने आतड्यांमध्ये गॅस तयार होतो. त्यामुळे पोटदुखी सुरू होते आणि शरीराला सूज येते, असे डॉक्टरांनी सांगितले. या तरुणाच्या आतड्यांमध्येही मोठ्या प्रमाणात गॅस तयार झाला. त्यामुळे त्याच्या शरीराला ऑक्सिजनची कमतरता भासू लागली. त्यामुळे त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता. तसेच त्याला पोटदुखीचाही त्रास होत होता आणि त्याच्या अंगावरही सूज आली होती. त्यामुळे हेपेटिक इस्किमियामुळे (‘लिवर शॉक’) त्याचा मृत्यू झाला.

डॉक्टरांनी त्याच्या शरीरातील गॅस कमी करण्यासाठी औषधोपचार केले. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. उपचारादरम्यानच तरुणाचा मृत्यू झाला. मात्र, काही डॉक्टरांनी या घटनेबाबत शंका उपस्थित केली आहे. दीड लिटर कोल्ड ड्रिंक पिण्याने मृत्यू होण्याची घटना अविश्वसनीय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या तरुणाला इतर काही त्रास असेल. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. मात्र, कोल्ड ड्रिंक आरोग्यासाठी घातक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *