मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. या पावसामुळे अनेक धरणे ओसंडून वाहत आहे. यानंतर आता सप्टेंबर महिन्याच्या शेवटी पुन्हा एकदा राज्यात पावसाचा जोर वाढत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
मागील काही दिवसांपासून बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र कार्यरत आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.
तर येत्या 12 तासात बंगालच्या उपसागरातील हवेच्या कमी दाबाचा पट्टा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विदर्भासहीत मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर अधिक असणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.