Uncategorized

पंढरपूर अर्बन बँकेचा समर्पण पुरस्काराने गौरव

कोरोना काळात देखील ग्राहकांना अखंड सेवा देत ग्रामीण भागात सर्वसामान्य जनतेपर्यंत आर्थिक मदतीचा हात दिल्याबद्दल पुणे येथील ग्रीनवर्ल्ड पब्लिकेशनच्या वतीने विविध सहकारी बँकांचा सन्मान केला असून त्यावेळी आपले पंढरपूर अर्बन को.ऑप. बँकेस समर्पण पुरस्काराने गौरविण्यात आले.  पुणे येथील कॉसमॉस बँकेच्या सभागृहात हा पुरस्कार सोहळा पार पडला. निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले, सहकार आयुक्त अनिल कवडे व कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे यांच्या हस्ते पंढरपूर अर्बन बँकेचे संचालक हरिष ताठे व मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश विरधे यांना सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कोरोना महामारीमुळे अवघे जग थांबले होते. याकाळात कोणाशीही संपर्क येवू नये म्हणून अवघा देश घरातच होता. परंतु बँकेतील कर्मचार्‍यांनी मात्र मोठा धोका पत्करून अखंड सेवा दिली. ग्राहकांची गरज ओळखून कोरोना काळात देखील बँका सुरूच ठेवण्यात आल्या होत्या. कर्मचार्‍यांना कोरोनाचा धोका असताना देखील कामात कोणतीही कुचराई न करता सेवा या उदात्त भावनेने बँकेने आपली जबाबदारी पूर्ण केली. याच काळात कोरोना लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणीच्या काळात पंढरपूर बँकेने रिझर्व्ह बँकेचे निकष पाळून प्रवासी व मालवाहतूक वाहनधारक, टांगा-रिक्षा, केश कर्तनकार, चर्मकार, वाहन दुरूस्ती करणारे मेकॅनिक, टेलर, पेंटर, प्लंबर, परीट, कामगार, मजूर, रोडच्या कडेला विक्री करणारे, भाजीपाला विक्रेते, हातगाडेवाले, हारफुलविक्रेते व्यावसायिक इत्यादी व्यवसाय करणारे तसेच कापड, जनरल स्टोअर्स, ऍटोमोबाईल्स, फोटोग्राफर, यात्रेवर व्यवसाय करणारे कुंकू बुक्का, चुरमुरे, पेढे विक्रेते प्रासादिक भांडार, बांगडी व्यवसायधारक तत्काळ कर्ज उपलब्ध करून दिले होते. यामुळे पंढरपूर अर्बन बँकेस समर्पण पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *