गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

जामिनावर सुटताच तुफान गोळीबार, हत्येच्या आरोपातील तरुणाची निर्घृण हत्या

जळगाव : भुसावळ तालुक्यातील नशिराबाद खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर सुटलेल्या एका संशयित आरोपीची अज्ञात मारेकऱ्यांनी निर्घृणपणे हत्या केली आहे. जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथे आज (मंगळवारी) सायंकाळी साडेसात राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपुलाखाली ही घटना घडली. या घटनेत हत्या झालेल्या तरुणाचे वडील देखील गंभीर जखमी झाले आहेत.

जळगावातून दुचाकीने भुसावळला जात होते

धम्मप्रिय मनोहर सुरळकर (वय 19) असे या घटनेतील मृत तरुणाचे नाव असून, मनोहर दामू सुरळकर (वय 45) असे त्याच्या जखमी झालेल्या वडिलाचे नाव आहे. धम्मप्रिय व मनोहर सुरळकर हे भुसावळ शहरातील पंचशील नगरातील रहिवासी आहेत. ते आज सायंकाळी जळगावातून दुचाकीने भुसावळला घरी जात होते. मात्र, मारेकऱ्यांनी त्यांच्यावर अचानकपणे सशस्त्र हल्ला केला. त्यात धम्मप्रियचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचे वडील गंभीर जखमी झाले. त्यांना जवळच्या डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

धम्मप्रिय खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी

मिळालेल्या माहितीनुसार ऑक्टोबर 2020 रोजी भुसावळ शहरातील पंचशील नगरात एका व्यक्तीचा खून झाला होता. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. या खुनाच्या गुन्ह्यात धम्मप्रिय सुरळकर हा संशयित आरोपी होता. त्याला या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. तसेच तो जळगाव उपजिल्हा कारागृहात होता. आज त्याला भुसावळच्या न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. कारागृहातून सुटल्यानंतर तो वडिलांसह दुचाकीने जळगावातून भुसावळच्या दिशेने जात होता.

आधी गोळीबार नंतर चॉपरने वार करुन हत्या

मात्र, नशिराबाद येथे महामार्गावर असलेल्या उड्डाणपुलाखाली त्याच्यावर अज्ञात मारेकऱ्यांनी गोळीबार केला. त्यात जखमी झाल्याने दोघे जण दुचाकीवरून जमिनीवर पडले. मारेकऱ्यांनी नंतर धम्मप्रिय याच्यावर चॉपरने वार करत त्याची निर्घृणपणे हत्या केली. त्यानंतर मारेकऱ्यांनी तेथून पळ काढला. घटनेची माहिती होताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून त्यांनी तपास सुरु केलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *