ताज्याघडामोडी

तुपकरांची प्रकृती खालावल्याने समर्थकांचा उद्रेक, पोलिसांच्या वाहनाची तोडफोड

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाने आता वेगळे वळण घेतले आहे. नागपूरमध्ये पोलिसांनी आंदोलन चिरडल्यानंतर तुपकरांनी आपल्या निवासस्थानासमोर सत्याग्रह सुरू केला असून, त्यांची प्रकृती ढासळत चालली आहे.

शुक्रवारी सायंकाळी आंदोलनस्थळी शेख रफिक या कार्यकर्त्याने अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच त्याला ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला. त्याचवेळी चिखली मार्गावर कार्यकर्त्यांनी वाहतूक बंद केली. पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक केली. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. काही शेतकऱ्यांनी बुलडाण्याच्या तहसीलदारांची गाडी पेटवण्याचा प्रयत्न केल्याचंही समोर आलं आहे.

स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी जिल्हाभरात विविध ठिकाणी रास्ता रोको करून महाविकास आघाडी सरकारचा निषेध नोंदविला. सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बुधवारी नागपूर येथे अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली. मात्र, पोलिसांनी हे आंदोलन मोडीत काढले.

तुपकर व कार्यकर्त्यांना रात्रीच बुलडाणा येथे आणून सोडले. मात्र तुपकरांचा सत्याग्रह सुरूच आहे. दरम्यान, शुक्रवारी तुपकर यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्या आई आणि पत्नीदेखील आंदोलन मंडपात ठिय्या मांडून आहेत.

तुपकर यांची बिघडत चाललेली प्रकृती आणि आंदोलनाची शासन, प्रशासनाकडून अद्यापही गांभीर्याने दखल का घेतली जात नाही, असा सवाल करत पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. सायंकाळी शेख रफिक या कार्यकर्त्याने आंदोलनस्थळी मंडपासमोरच अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.

त्याचवेळी पोलिसांनी त्याला पकडले. या कार्यकर्त्याला सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेनंतर पोलीस प्रशासनाला कार्यकर्त्यांच्या प्रचंड रोषाला सामोरे जावे लागले. शेकडो कार्यकर्त्यांनी बुलडाणा ते चिखली महामार्गावर रास्तारोको करून वाहने अडवली. आंदोलन अधिक चिघळत चालले असतानाच पोलिसांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आल्याची माहिती समोर आली.

यामुळे आंदोलनस्थळी आणि चिखली रोड परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शीघ्र कृती दलालाही पाचारण करण्यात आले आहे.

रात्री ११ वाजताच्या सुमारास बुलडाण्याचे तहसिलदार रुपेश खंडारे यांचे शासकीय वाहन अज्ञातांनी पेटविण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. वाहन जाळण्याचा प्रयत्न करताना तहसिल कार्यालयातील एकाने बघितल्याने हा संपुर्ण प्रकार समोर आला त्यामुळे मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार प्रदीप साळुंके यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोवर अज्ञात आरोपींनी घटनास्थळावरून पसार झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *