गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

बापरे.दुधात चक्क सोयबीन तेल, घातक पॅराफीनची भेसळ; 40 ड्रमसह नाशिकमध्ये एकाला बेड्या

जिल्ह्यातल्या सिन्रर तालुक्यातल्या पाथरे खुर्द गावामध्ये दुधात चक्क सोयाबीन तेल आणि पॅराफीनसारख्या घातक पावडरची भेसळ करून विक्री करणाऱ्यास अन्न भेसळ प्रतिबंधक व सुरक्षा विभागाच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.अक्षय गुंजाळ असे आरोपीचे नाव आहे.

सिन्नर तालुक्यातल्या पाथरे गावात स्वामी समर्थ दूध संकलन केंद्र आहे. या केंद्रावर दुधाची भेसळ सुरू होती. याची माहिती समजताच अन्न भेसळ प्रतिबंधक व सुरक्षा विभागाच्या पथकाने छापा टाकत कारवाई केली. तेव्हा त्यांना 320 लिटर भेसळयुक्त दूध सापडले.

या दुधामध्ये सोयाबीनचे तेल, घातक पॅराफीन पावडरची भेसळ करण्यात येत होती. याप्रकरणी अक्षय ज्ञानेश्वर गुंजाळ ( वय 23, रा. पाथरे खुर्द) याला ताब्यात घेण्यात आले. विशेष म्हणजे तो हे भेसळयुक्त दूध जऊळके (ता. कोपरगाव) येथील न्यू ज्ञानेश्वर दूध संकलन केंद्रास विकत होता. या कारवाईत अन्न व सुरक्षा विभागाने 40 लिटरचे आठ ड्रम जप्त केले आहेत.

दूध संकलन चालक गुंजाळ हा उजनी हेमंत पवार आणि शेख नावाच्या व्यक्तीकडून या रासायनिक पदार्थांची खरेदी करायचा. तशी कबुली त्याने दिली आहे. दरम्यान, याप्रकरणी गुंजाळसह इतर चौघांविरुद्ध वावी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सागर कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रकाश गवळी हे करत आहेत.

प्रशासनाचा वरदहस्त?

दरम्यान, या प्रकरणात ज्याच्यावर गुन्हा नोंदविला आहे, त्या हेमंत पवार याच्यावर प्रशासनाचा वरदहस्त असल्याची तालुक्यात चर्चा आहे. दोन वर्षांपूर्वी सिन्नर पोलिसांनी एक मोठी कारवाई केली होती. त्यावेळी दुधात भेसळीसाठी वापरल्या जाणाऱ्या रासायनिक पावडरचा साठाही जप्त केला होता. या प्रकरणीही पवारवर गुन्हा दाखल केला होता. या कारवाईनंतर या पावडरचे नमुने अन्न भेसळ व सुरक्षा विभागाकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले. मात्र, त्याचे पुढे काय झाले माहित नाही. विशेष म्हणजे पवारने हे प्रकरण ‘अर्थ’पूर्ण व्यवहारातून मॅनेज केल्याची चर्चा होती. पवार हाच तालुक्यात दुधात लागणाऱ्या भेसळीचे रसायन पुरवतो, अशी चर्चा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *