ताज्याघडामोडी

पगार आणि बँकेतील पैशांसंदर्भातील नियम १ ऑक्टोबरपासून बदलणार, तुमच्या खिश्यावर पडणार भार?

सप्टेंबर महिना पूर्ण होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. यातच १ ऑक्टोबरपासून तुमच्या पगार आणि बँकेतील पैशांसंदर्भातील नियमांत मोठे बदल होणार आहेत. या नव्या नियमांमुळे तुमच्या पगारावर परिणाम होत बँकेत जमा होणारा पगार कमी होऊ शकतो.

याशिवाय बँकेतील पैशांसंदर्भातील नियमात बदल होणार आहे. नेमके बँकेशी संबंधित नियमांत काय बदल होणार? यामुळे तुमच्या खिश्यावर भार पडणार का? अशा अनेक प्रश्नांसाठी हे नियम जाणून घेण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून व्य़वहार करताना कोणत्याही अडचणी येणार नाहीत.

हातात य़ेणार पगार होणार कमी

वेतन २०१९ कायद्याअंतर्गत भरपाईचे नियम १ ऑक्टोबरमध्ये सर्वत्र लागू होण्याची शक्यता आहे. हे नियम बहुतांश खासगी कंपन्यांमध्येही लागू होऊ शकतात. या नियमांनुसार, पगारामध्ये येणाऱ्या भत्त्याचा हिस्सा ५० टक्क्यांपेक्षा जास्त असू शकत नाही. याचा अर्थ असा की, आपल्या पगारामध्ये मूळ वेतनाच्या भत्त्याचा हिस्सा ५० टक्के असणे आवश्यक आहे, जे अनेक कंपन्या खूप कमी देतात. यात तुमचा पगार अनेक विभागांत विभागला जाईल, यामुळे तुमच्या खात्यात जमा होणारा पगार कमी होऊ शकतो, तर पीएफमध्ये जास्त पैसे जमा होऊ शकतात.

ट्रेडिंग खात्यासाठीचे केवायसी नियम बदलणार

भारतीय सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड (SEBI) ने ट्रेडिंग खात्यांमध्ये गुंतवणूकदारांसाठी केवायसी अनिवार्य केले आहे. यापूर्वी केवायसी अद्ययावत करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै होती,ती मुदत वाढ देत ३० सप्टेंबर करण्यात आली. यामुळे गुंतवणूकदारांनी केवायसी करणे आवश्यक आहे. केवायसी तपशीलात पत्ता, नाव, पॅन, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, उत्पन्न श्रेणी इत्यादी अद्ययावत करणे आवश्यक आहे.

ऑटो डेबिट कार्ड बंद

रिझर्व्ह बँकेच्या नव्या नियमांनुसार, ग्राहकांना प्रथम त्यांच्या ऑनलाईन व्यवहारासाठी आता मान्यता द्यावी लागेल. म्हणजे, जर तुमच्या खात्यातून कोणतेही ईएमआय, मोबाईल बिल पेमेंट, वीजबिल, एसआयपी पेमेंट किंवा ओटीटी पेमेंट जात असेल तरी ती रक्कम आधी तुम्हाला मंजूर करावी लागेल. यानंतरच व्यवहार ऑनलाईन ठेवले जातील. यासाठी तुमचा मोबाईल नंबर सर्वत्र अपडेट करावा लागेल. ही प्रक्रिया OTP द्वारे पूर्ण केली जाईल. आरबीआयच्या नियमानुसार, बँकांना कोणत्याही ऑटो पेमेंटपूर्वी ग्राहकांना सूचना द्यावी लागेल आणि ग्राहकांनी मंजूर केल्यानंतरच बँक खात्यातून पैसे काढण्याची परवानगी असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *