ताज्याघडामोडी

हसन मुश्रीफांचा घोटाळा दाबण्यासाठी गृहमंत्र्यांकडून मला अटकेचे आदेश- किरीट सोमय्या

महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर आरोप करणारे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कोल्हापूर दौऱ्यावर पोलिसांना बंदी घातली आहे. यामुळे किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारवर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत.

हसन मुश्रीफ यांचा घोटाळा उघड केल्यानंतर आता आपण विदर्भातील नेत्याचा घोटाळा बाहेर काढणार होतो. शरद पवार यांना हे कळल्यामुळेच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगून माझा कोल्हापूर दौरा प्रतिबंधित केला असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. सोमय्या यांच्या मुंबईतील घराबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

हसन मुश्रीफ यांचा घोटाळा बाहेर येऊ नये म्हणून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मला अटक करण्याचे आदेश दिले असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत म्हटलं की, “ठाकरे सरकारची दडपशाही, माझ्या घराखाली पोलिसांची गर्दी, माझा कोल्हापूर दौरा थांबविण्यासाठी, हसन मुश्रीफांचा घोटाळा दाबण्यासाठी घरातून अटक करण्याचे गृहमंत्री आदेश. मी मुलुंड निलम नगरहून 5.30 ला निघणार, आधी गिरगाव चौपाटी गणेश विसर्जन आणि तिथून 7.15 वाजता CSMT स्टेशन महालक्ष्मी एक्स्प्रेस.”

किरीट सोमय्या यांनी कोल्हापूर जिल्ह्यात येऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने देखील आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. सर्व पोलिस बंदोबस्त गणेश विसर्जनात व्यस्त राहणार असल्याने दौऱ्यासाठी बंदोबस्त पुरवायला प्रशासनाने असमर्थता दर्शवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून होणारा विरोध पाहता उद्याचा दौरा रद्द करण्याची जिल्हाधिकाऱ्यांनी किरीट सोमय्या यांना विनंती केली आहे. दरम्यान भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. तसेच यासंदर्भात सर्व पुरावे असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *