ताज्याघडामोडी

राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस

संभाजीनगर जिल्ह्यासह मराठवाडा विभागात पावसासाठी वातावरण अनुकूल बनले असून हवामान खात्याने 20 ते 22 सप्टेंबर या कालावधीमध्ये येलो अलर्ट जारी केला आहे. या कालावधीत विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे.

ढगांचा गडगडाट आणि विजेच्या कडकडाटासह पावस होण्याच्या शक्यतेमुळे नागरिकांनी विशेषता शेतकऱ्याने सतर्कता बाळगावी, असे आवाहन परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषि मौसम सेवा केंद्राचे मुख्य प्रकल्प समन्वयक डॉ. के.के. डाखोरे यांनी केले आहे.

मराठवाडा विभागात दहा ते बारा दिवसापूर्वी जोरदार पाऊस झाला होता. काही भागात अतिवृष्टी आणि काही जिल्ह्यात ढग फुटी झाल्याच्या घटना घडल्या होत्या. संभाजीनगर जिल्ह्यात या पावसाने शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले. याची झळ जिल्ह्यातील सव्वा तीन लाख शेतकऱ्यांना बसली आहे. गेल्या दोन दिवसापासून वातावरणात पूर्णता बदल झाला आहे. त्यामुळे पुन्हा जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विभागात दहा दिवसांपूर्वीच या पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे शिवाय जीवितहानी ही झाली आहे. मराठवाडा विभागात 20 सप्टेंबर रोजी संभाजीनगर जिल्ह्यासह जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात येलो अलर्ट दर्शवला असून लातूर, धाराशिव हे जिल्हे वगळता उपरोक्त सहा जिल्ह्यात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता व्यक्त केली आहे. 21 सप्टेंबर रोजी जालना, संभाजीनगर, परभणी, हिंगोली, बीडमध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे असे डॉ. डाखोरे यांनी व्यक्त केली आहे. 22 सप्टेंबर रोजीही पावसाचा मुक्काम राहील असा अंदाज असून या अंदाजानुसार संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली येथे येलो अलर्ट दर्शवण्यात आला असून या जिल्ह्यात ही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे असेही सांगण्यात आले आहे.

परतीचा पाऊस लांबला

वातावरणातील बदलामुळे ऋतुचक्र ही बदलत आहे. पूर्वी सप्टेंबरपर्यंत पाऊस पडत असे, मात्र या बदलत्या वातामुळे यंदा परतीचा पाऊस पंधरा दिवस पुढे सरकला आहे. या बदलानुसार परतीचा पाऊस 15 ऑक्टोबरपर्यंत राहील, असे डॉ. के. के . डाखोरे यांनी दैनिक सामनाशी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *