ताज्याघडामोडी

‘तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ‘या’ पाच जिल्ह्यांनी सतर्क रहावं’ – आरोग्यमंत्री राजेश टोपे

आरोग्यमंत्री राजेश टोपे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. राजेश टोपे यांनी चाकणमधील एका खासगी रुग्णालयाला भेट दिली. आरोग्यमंत्र्यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यातील कोरोना स्थिती, कोरोना प्रतिबंधक लसीकरण आणि शाळा सुरु करण्यासंदर्भात विविध मुद्यांवर त्यांनी भाष्य केलं.

राज्यातील पुणे, मुंबई, रत्नागिरी, सातारा आणि अहमदनगर या जिल्ह्यांना आणखी सतर्क राहण्याची गरज असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्येपैकी सत्तर टक्के रुग्ण या जिल्ह्यांमध्ये असल्यानं कोरोना सुसंगत वर्तन, लसीकरणाला प्राधान्य आणि नागरिकांनी काळजी घेण्याची गरज असल्याचं राजेश टोपे म्हणाले.

राजेश टोपे यांचे आवाहन

पुणे, मुंबई, रत्नागिरी, सातारा आणि अहमदनगर या जिल्ह्यांना आणखी सतर्क राहण्याची गरज आहे. कारण, या पाच जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसेना. आजच्या तारखेला तर राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत याच जिल्ह्यांचा सत्तर टक्के वाटा आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असं आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी केलंय. त्याअनुषंगाने या पाच जिल्ह्यांनी कोरोना नियमांचं तंतोतंत पालन करण्याची गरज असल्याचं टोपे यांनी नमूद केलंय.पुणे जिल्ह्यातील चाकणमध्ये एका खासगी रुग्णालयात ते आले होते. तेंव्हा राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत एकट्या पुणे जिल्ह्याचा बावीस टक्के वाटा आहे. म्हणजे ही निर्बंधाकडे वाटचाल म्हणायची का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला होता. त्याला उत्तर देताना टोपेंनी पाच जिल्ह्यांना हा सतर्कतेचा इशारा दिला.

सध्याची स्थिती काय आहे

राजेश टोपे यांनी सांगितलेल्या माहितीनुसार पुण्यात सध्या 12413 , सातारा जिल्ह्यात 6328, मुंबईत 4273, रत्नागिरी जिल्ह्यात 1081 आणि अहमदनगरमध्ये 4975 सक्रिय रुग्ण आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात काल दिवसभरात 125 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर, दिवसभरात 5 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. याशिवाय 118 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्ण रत्नागिरी आणि चिपळूण तालुक्यात आहेत. सातारा जिल्ह्यात सोमवारी 308 नव्या कोरोना रुग्णांची नोदं झाली तर, एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे.

डॉ. प्रभू यांच्या अध्यक्षतेखालील टास्क फोर्स आहे, त्यांनी एसओपी दिलेली आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचं शंभर टक्के लसीकरण होणं आवश्यक आहे. संपूर्ण शाळा सॅनिटाईज करावी, विद्यार्थ्यांची उपस्थिती कशी असावी, यासंदर्भातील सूचना शालेय शिक्षण विभागाला दिल्या आहेत. शालेय शिक्षण विभागानं यासंदर्भातील प्रस्ताव दिला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासंदर्भात निर्णय घेतील, असं राजेश टोपे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *