ताज्याघडामोडी

एसटी कामगारांना मोठा दिलासा! महामंडळाला तातडीने 500 कोटी

 

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर आवश्‍यक बाबींसाठी 500 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. हा निधी तातडीने वितरीत करण्यात आला आहे.चालू आर्थिक वर्षासाठी 1450 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतूदीपैकी 838 कोटी रुपयांचा निधी एसटीला आधीच वितरीत केला असून उर्वरीत 612 कोटींपैकी 500 कोटी रुपये तातडीने एसटी महामंडळाला देण्यात यावेत, असे निर्देश अजित पवार यांनी दिले. त्यानंतर तातडीने हा निधी वितरीत करण्यात आला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार निधी वितरीत झाल्याने एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन तसेच महामंडळाचे आर्थिक प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.करोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर परिणाम होत असून महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती काम करत आहे. समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासंदर्भातील उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. त्यानुसार येणाऱ्या काळात कार्यवाही करण्यात येणार आहे.

अजित पवार यांनी 500 कोटी रुपये वितरीत करण्याचे निर्देश दिले. त्यानुसर तातडीने निधी वितरीत करण्यात आला. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.करोनामुळे मागील दीड वर्षांपासून एसटी महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा तोटा झालेला आहे. त्यामुळे एसटी महामंडळाचे आर्थिक बजेट पूर्णपणे कोलमडले असून एसटी कर्मचाऱ्यांचे जुलै 2021 महिन्याचे वेतन रखडले आहे.

त्यामुळे मान्यता प्राप्त एसटी कर्मचारी संघटनांनी औद्योगिक न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनतर शनिवारी औद्योगिक न्यायालयाने महामंडळाला झापत 3 सप्टेंबर पर्यंत सर्व एसटी कामगारांचे वेतन करण्याचे आदेश दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *