ताज्याघडामोडी

नितेश राणे, वैभव नाईक यांच्यासह भाजप- शिवसेनेच्या नेत्यांवर गुन्हे दाखल

केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेत जमावबंदी आणि कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी नितेश राणे, वैभव नाईक यांच्यासह भाजप व सेनेच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांवर कणकवलीत गुन्हे दाखल केले आहेत.शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्यासह ३० ते ४० शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.तर भाजप चे आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे यांच्यासह ५० ते ६० व्यक्तींवरदेखील गुन्हे दाखल झाले आहेत.महाराष्ट्र पोलीस कायदा 135, 188, 143 अन्वये गुन्हे दाखल झाले आहेत.

नारायण राणेंची स्थगित झालेली जनआशीर्वाद यात्रा शुक्रवारी रत्नागिरी येथून पुन्हा सुरु झाली. ही यात्रा रत्नागिरीतून सिंधुदुर्गमध्ये दाखल झाली. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना साथरोग नियंत्रण प्रतिबंधात्मक आदेश लागू केला आहे. तसेच जमावबंदीचा आदेशही देण्यात आला होता. मात्र, या आदेशाचे उल्लंघन भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दरम्यान नारायण राणे यांनी रत्नागिरीत शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना तसेच सरकारवर टीका केली होती.मी कुठलाही गुन्हा केलेला नाही. काही लोकांना सत्तेचा माज आला आहे. आम्ही कायम विरोधात राहू यासाठी जन्माला आलेलो नाही. उद्या राज्यात सत्ता आल्यानंतर पुढे कोणावर कारवाई झाली तर बोंब मारू नका. माझ्या नादाला लागू नका. मी तोंड उघडले तर ते तुम्हाला परवडणार नाही. वेळीच आवर घाला. टप्प्याटप्प्याने तुमची प्रकरणे बाहेर काढू, असा सज्जड इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेला दिला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *