गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

हेल्मेटशिवाय पेट्रोल न दिल्याने चौघांची पंप कर्मचाऱ्याला मारहाण

नाशिकमध्ये पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी स्वातंत्र्यदिनापासून ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ अशी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेला आव्हान देणारी घटना पंचवटीत घडली.पेट्रोल टाकण्यासाठी आलेल्या चौघा जणांच्या टोळक्याला हेल्मेटशिवाय पेट्रोल मिळणार नसल्याचे सांगण्यात आले. यानंतर या टोळक्‍यांनी पंप कर्मचाऱ्याला मारहाण करून जखमी केले.

पंप कर्मचाऱ्याला मारहाण केल्यामुळे पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. या प्रकरणी चौघा अज्ञात संशयितांविरोधात म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

या विषयी अधिक माहिती अशी की, दिंडोरी रोडवरील म्हसरूळ परिसरातील इच्छामणी पेट्रोलपंपावर बुधवारी (दि. १८) सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास चार अनोळखी युवक आले. त्यांनी येथील कर्मचारी ज्ञानेश्वर पोपट गायकवाड (वय २४, रा. चाचडगाव ता. दिंडोरी जि. नाशिक) यांच्याकडे पेट्रोल मागितले. तेव्हा ज्ञानेश्वर पोपट गायकवाड यांनी पोलीस प्रशासनाच्या आदेशानुसार हेल्मेट नसल्याच्या कारणावरुन त्यांना पेट्रोल देण्यास नकार दिला.

त्याचा राग आल्याने संशयितांनी कर्मचाऱ्याला शिवीगाळ करुन मारहाण सुरू केली. त्यांपैकी एकाने दगड फेकून मारुन त्‍याला गंभीर जखमी केले. या प्रकरणी मिलींद विवेक कुलकर्णी (वय ३६, रा. महात्मानगर) यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात धाव घेत चौघा अज्ञात संशयितांविरोधात फिर्याद दाखल केली.

साडेचार तासांत तिघांना अटक…

या प्रकरणी बुधवारी रात्री १२ च्या सुमारास गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी चौघा अज्ञात संशयितां विरोधात गुन्हा दाखल केला.

रातोरात तपासाची चक्रे फिरवून अवघ्या चार ते पाच तासांत म्हणजे आज (गुरुवार) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास तिघा संशयितांना अटक केली असून, आणखी एका संशयिताचा शोध सुरू असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक एस. बी. अहिरे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *