ताज्याघडामोडी

शिवसेनेचा आणखी एक आमदार अडचणीत

महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक शिवसेना आमदार अडचणीत येताना दिसून येत आहे. आयकर विभागाने यामिनी यशवंत जाधव यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे. यामिनी यशवंत जाधव मुंबईतील भायखळा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत MIM च्या वारीस पठाणचा त्यांनी पराभव केला होता.
आयकर विभागाने म्हटलंय की, २०१९ मध्ये निवडणुकीत यामिनी जाधव यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात संपत्ती संबंधित चुकीची माहिती जोडली होती.

त्यासाठी यामिनी जाधव यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. या प्रकरणी आयकर विभागाने यामिनी जाधव यांच्या प्रतिज्ञापत्राची चौकशी केली असता ही बाब समोर आली. तपासात कोलकाता येथील शेल कंपन्याद्वारे काही आर्थिक व्यवहार झाल्याचं उघडकीस आलं. ज्यात यामिनी जाधव, त्यांचे पती आणि कुटुंबाने पैसे कमवले होते.

 

यामिनी जाधव यांच्या प्रतिज्ञापत्रात सांगितले की, यामिनी यांनी प्रधान डिलर्स नावाच्या कंपनीकडून १ कोटींचे कर्ज घेतले होते. जेव्हा याचा तपास सुरु झाला तेव्हा प्रधान डिलर्स नावाची एक शेल कपंनी कोलकात्याकडून उदय महावर नावाचा व्यक्ती चालवत होता. उदय महावर तोच व्यक्ती आहे ज्याचं नाव नॅशनल हेराल्ड प्रकरणातही समोर आलं होतं. तपासावेळी १५ कोटींची हेराफेरी झाल्याचं समोर आलं. आयकर विभागाचं म्हणणं आहे की, प्रतिज्ञापत्रात म्हटलंय की, यामिनी यांच्यावर १ कोटींचे कर्ज आहे परंतु हा पैसा त्यांचाच आहे.

आयकर विभागाच्या चौकशीत उदय महावर यांनी सांगितले की, २०११-१२ मध्ये त्याने प्रधान डिलर्स नावाची कंपनी बनवली होती. त्यात पैसे जमवले त्यानंतर ही कंपनी जाधव कुटुंबाला विकली होती. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत यामिनी जाधव यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. त्यात जवळपास ७.५ कोटी संपत्ती असल्याची माहिती देण्यात आली होती. ज्यात २.७४ कोटींची स्थावर मालमत्ता होती. तर आमदार यामिनी जाधव यांचे पती यशवंत जाधव यांच्याकडे ४.५९ कोटी संपत्ती असल्याचं समोर आलं होतं. ज्यात १.७२ कोटींची स्थावर मालमत्ता होती. यशवंत जाधव हे मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष आहेत.

इंडिया टूडेनं दिलेल्या वृत्तानुसार, या कंपनीच्या संचालकपदी चंद्रशेखर राणे, कृष्णा भंवारीलाल तोडी, धीरज चौधरी अशा ३ जणांची संचालक म्हणून नावं आहेत. उदय महावर यांच्या हाताखाली तिघं काम करतात. आयकर खात्याने कंपनीचे संचालक चंद्रशेखर राणे आणि माजी संचालक प्रियेश जैन यांचीही या प्रकरणी चौकशी केली. या दोघांच्या जबाबानुसार त्यांना डम्मी संचालक बनवण्यात आलं होतं. उदय महावर हे कंपनी व्यवस्थापन करणार असल्याचं त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे आता शिवसेनेच्या प्रताप सरनाईक यांच्यानंतर आमदार यामिनी जाधव अडचणीत आल्यानं शिवसेना नेतृत्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची(CM Uddhav Thackeray) डोकेदुखी वाढली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *