ताज्याघडामोडी

भारतामध्ये आढळून आल्या कोव्हिशिल्डच्या बनावट लसी; WHO आणि सीरमकडून दुजोरा

सध्या देशभरात व्यापक लसीकरणाची मोहीम राबवली जात असून १८ वर्षावरील व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन, मॉडर्ना, स्पुटनिक व्ही आणि नुकतीच परवानगी मिळालेली जॉन्सन अँड जॉन्सन या लसी भारतीयांना दिल्या जात आहेत.नागरिकांमध्ये या पार्श्वभूमीवर दिलासा मिळाल्याची भावना असतानाच जागतिक आरोग्य संघटनेने एका गंभीर गोष्टीकडे संपूर्ण जगाचे आणि विशेषत: भारताचे लक्ष वेधले आहे.

भारतात कोवीडशिल्ड लसीचे बनावट डोस आढळल्याची माहिती समोर आली आहे. खुद्द सीरम इन्स्टिट्युटने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यामुळे लसीकरणामुळे कोरोनाची भिती काहीशी कमी होत असताना बनावट लसीमुळे ही भिती पुन्हा डोक वर काढू लागली आहे.

मंगळवारी यासंदर्भातील इशारा जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO ने आपल्या संकेतस्थळावर देखील दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या तपासणी विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे. भारतामध्ये कोव्हिशिल्ड लसीच्या २ एमएलच्या वायल्स आढळून आल्या आहेत. पण वास्तवात सीरम इन्स्टिट्युटकडून २ एमएलच्या वायल्स तयारच केल्या जात नाहीत. दुसरीकडे युगांडामध्ये १० ऑगस्टलाच एक्स्पायरी डेट उलटून गेलेल्या कोव्हिशिल्ड लसींची एक बॅच दिसून आल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने यासंदर्भात अधिक जागरुकपणे काळजी घेण्याचे आवाहन देखील या देशांना केले आहे.

अशा प्रकारच्या बनावट लसी आरोग्यासाठी मोठी चिंतेची बाब ठरत असून कोरोना होण्याची शक्यता अधिक असलेल्या नागरिकांसाठी गंभीर ठरू शकतात, असे जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आले आहे. या बनावट लसी तातडीने शोधून काढून हटवणे हे लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने फार आवश्यक असल्याचे देखील जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या वेबसाईटवर नमूद केले आहे.

दरम्यान, बनावट लसींचा धोका टाळण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून रुग्णालये, क्लिनिक्स, आरोग्य केंद्रे, वितरक, फार्मसी आणि वितरणाच्या इतर सर्व टप्प्यांवर बारीक नजर ठेवण्याचं आवाहन करण्यात आले आहे. तसेच, तुम्ही जर अशा प्रकारची लस घेतली असेल, तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं देखील आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *