गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

स्वातंत्र्यदिनी दोन हजारांची लाच स्वीकारणारी ग्रामसेविका एसीबीच्या जाळ्यात

गडचिरोली तालुक्यातील मरेगाव येथील ग्रामसेविका प्रीती लक्ष्मीकांत त्रिशुलवार यांना 2 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज स्वातंत्र्यदिनी रंगेहाथ पकडले. अंगणवाडीत स्वयंपाक करणाऱ्या महिलेचे मानधन अदा करण्यासाठी तिच्याकडून त्यांनी लाच मागितली होती.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारकर्त्या महिलेला ग्रामपंचायत कार्यालयाकडून तिच्या मानधनाचा धनादेश घ्यावयाचा होता. परंतु धनादेश देण्याचा मोबदला म्हणून ग्रामसेविका प्रीती त्रिशुलवार हिने तिला पंचासमक्ष 3 हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती ती 2 हजार रुपये स्वीकारण्यास तयार झाली.परंतु लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने स्वयंपाकी महिलेने गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

आज मरेगाव ग्रामपंचायत कार्यालय परिसरात सापळा रचला. यावेळी तक्रारकर्त्या महिलेकडून 2 हजार रुपयांची लाच स्वीकारताना ग्रामसेविका प्रीती त्रिशुलवार हिला ग्रामपंचायत कार्यालयासमोर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.तिच्यावर आरमोरी पोलिस ठाण्यात भष्ट्राचार प्रतिबंधक अधिनियम 1988 च्या कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *