ताज्याघडामोडी

आ.समाधान आवताडे बुधवारी घेणार अजितदादांची भेट

पंढरपुर शहर तालुक्यात गेल्या आठ दिवसात मोठया वेगाने कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली असून आज मंगळवार दिनांक १० ऑगस्ट रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे १०७५ कोरोना बाधित सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत.ही परिस्थिती अशीच कायम राहिली तर पुढील काही दिवसात पुन्हा पंढरपूर शहर आणि तालुक्यात कोरोनाची परिस्थिती एप्रिल आणि मे महिन्या प्रमाणे धोकादायक होईल असा प्रशासनाचा अदांज आहे.आणि हाच संभाव्य धोका टाळण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी १३ ऑगस्ट पासून पंढरपूर शहर तालुक्यात संचार बंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.मात्र या निर्णयामुळे पंढरपूर शहरातील छोटे मोठे व्यवसायिक,दुकानदार व सामान्य नागिरक यांच्याकडून मात्र मोठी नाराजी व्यक्त होत आहे.

काल पासून व्यापारी मंडळी संघटितपणे या आदेशाचा विरोध करत आहेत तर आज येथील व्यापाऱ्यांनी घंटानाद करून या निर्णया विरोधात आंदोलनही केले.काल आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपूर शहरातील व्यापारी वर्गाशी संवाद साधत त्यांच्या भावना जाणून घेतल्या आणि जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याशी फोनवरून चर्चा करून व्यापारी वर्गाच्या भावनाही त्यांच्या पर्यंत पोहोचविल्या.मात्र प्रशासकीय पातळीवर निर्णय घेताना पंढरपुर तालुक्यात वाढत चाललेल्या कोरोना बाधितांची संख्या,उपलब्ध ऑक्सिजन बेड,अशीच रुग्णवाढ कायम राहिली तर निर्माण होणारी परिस्थिती  आमदार समाधान आवताडे याना कथन केल्याचे समजते.परंतु संपूर्ण संचारबंदी लागू करण्याऐवजी तालुक्यातील ज्या गावात रुग्ण अथवा बाधितांची संख्या जास्त आहे तेथे कंटेनमेंट झोनची कडक अंमलबजावणी करा पण संपूर्ण शहर व तालुक्यात संचारबंदी करणे चुकीचे आहे हि भूमिका आमदार समाधान आवताडे हे उद्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन मांडणार असल्याचे समजते.

पंढरपूर शहरापेक्षा तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली असून तालुक्यात दरदिवशी शंभरच्या आसपास नवे कोरोना बाधित आढळून येत आहेत.शहरात मात्र हि संख्या तूर्तास तरी नगण्य असली तरी तालुक्यातील जनतेचा शहराशी असलेल्या रोजच्या सापकांमुळे पंढरपुर शहरासही कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढण्याचा धोकाही वाढू शकतो अशी प्रशासनाची धारणा आहे.आणि हीच भूमिका जिल्हा प्रशासन लोकप्रतिनिधींपुढे मांडत आहे.पंढरी वार्ताशी बोलताना आमदार समाधान आवताडे यांनी प्रशासनास वाटत असलेली भीती हि काही प्रमाणात रास्त असली तरी संचार बंदी हा शेवटचा उपाय आहे,पंढरपूरच्या ग्रामीण भागात ज्या गावात वेगाने बाधितांची आहे तेथे महानगराच्या धर्तीवर कंटेनमेंट झोन करून त्याची कडक अंमलबजावणी केली जावी ,इतर जिल्ह्यातून पंढरपुरात येणाऱ्या भाविकांची वर्दळ वाढली आहे त्यास प्रतिबंध करावा,शहरातील सर्व छोटे मोठे व्यवसायिक यांना फ्रॉन्टलाईन वर्कर समजून विशेष लसीकरण मोहीम हाती घ्यावी.आज पंढरपूर तालुका हा जिल्ह्यातील सार्वधिक सक्रिय कोरोना बाधित असलेला तालुका आहे मात्र लसीचा पुरवठा होताना तो अतिशय कमी प्रमाणात होत आहे त्यात विशेष बाब म्हणून वाढ करण्यात यावी असे मत आमदार समाधान आवताडे यांनी व्यक्त केले.बुधवारी ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून हीच भूमिका मांडतील अशी अपेक्षा आहे.

मात्र याच वेळी एक गंभीर बाब अधोरेखित करावी लागेल.पंढरपूर तालुक्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून गेल्या जवळपास १० वर्षांपासून कार्यरत असलेले एकनाथ बोधले यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी पंढरपूर तालुक्यातील कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन योग्य त्या उपायोजना करण्यात कुचराई केली या बाबत करणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिल्याचे समजते, त्याच बरोबर पंढरपूर तालुक्यातील विविध लसीकरण केंद्रात होत असलेल्या वशिलेबाजीबाबत सामान्य जनतेमधून तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.एकनाथ बोधले यांच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त होत आहे त्यामुळे प्रशासकीय पातळीवर देखील काही कठोर उपाय आणि बदल होणे गरजेचे झाले आहे.

यात्रा आधारित अर्थकारण असलेल्या पंढरपूरकरांसाठी करमाफीची मागणी केली जाणार ?  
पंढरपूर शहराचे अर्थकारण हे बहुतांश चार यात्रा आणि येथे विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या भेटीवर अवलंबून आहे.गेल्या वर्षी आषाडीसह चारही प्रमुख यात्रा कोरोनामुळे भरल्या नाहीत तर एरव्हीही येणाऱ्या भाविकांची संख्या प्रचंड रोडावली आहे.याही वर्षी आषाढी यात्रा भरली नाही त्यामुळे अगदी रस्त्यावर बसून माळा,फुले विकारणाऱ्या छोट्या व्यवसायिकांपासून ते शहरातील प्रसाद साहित्य विक्रेते,हॉटेल लॉज चालक यांचेही मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.दरवर्षी आषाढी यात्रा झाली कि शहरातील रहिवाशी स्वतःहून नगर पालिका कर भरण्यासाठी गर्दी करत.पण आता अर्थकारण ठप्प झाल्यामुळे कर भरणे कठीण होऊन बसले आहे.यात्रा न भरताही नगर पालिकेस गतवर्षी ५ कोटी झाले व यावर्षी ५ कोटी यात्रा अनुदान मिळणार आहे.याचा विनियोग शहरातील नगिरकांना किमान निवासी मालमत्ता धारकांना करमाफी करण्यात यावा अशी मागणी होत आहे.परंतु यात्रा अनुदानाच्या विनियोगा बाबत शासनाचे निकष आहेत ते दूर करावेत आणि शहरातील किमान निवासी मालमत्ता धारकांना तरी म्युन्सिल्प टॅक्स मध्ये किमान ५० टक्के सूट द्यावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.उद्या बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आणि आमदार समाधान आवताडे यांच्या भेटीत आमदार समाधान आवताडे यांनी हा कारमाफीचा प्रश्न उपस्थित करावा आणि विशेष बाब म्हणून जसे पंढपुरला यात्रा अनुदान मिळते तसेच विशेष बाब म्हणून करमाफीसाठी नियम शिथिल केले जावेत अशी मागणी करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *