गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

माहिती अधिकाराचा अर्ज करून १० लाखाच्या खंडणीची मागणी

पंढरपुरातील बोगस बांधकाम कामगार नोंदणीची यलगुंडे चौकशी करणार ?

सोलापूरचे जिल्हयाचे सहाय्यक कामगार आयुक्त म्हणून काम करणारे निलेश यलगुंडे हे पदभार स्वीकारल्यापासून सातत्याने टीकेचे धनी ठरले आहेत.कोरोनाच्या काळात सोलापूर जिल्ह्यातील खाजगी कामगार व नोंदणीकृत बांधकाम कामगार याना शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळण्याबाबत सह.कामगार आयुक्त कार्यालय हे उदासीन भूमिका निभावत आहे व सह.कामगार आयुक्त म्हणून कार्यरत असणारे निलेश यलगुंडे हे मनमानी पद्धतीने काम करत आहेत अशी नाराजी सर्व सामान्य कामगार वर्गातून व्यक्त होताना दिसून येत होती.
आता हेच वादग्रस्त सह.कामगार आयुक्त निलेश यलगुंडे हे पुन्हा चर्चेत आले आहेत ते त्यांनी दाखल केलेल्या फिर्यादीमुळे.सोलापूर शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ते गणेश बोड्डु यांच्या विरोधात निलेश यलगुंडे यांनी १० लाख रुपयाची खंडणी मागितली असा गुन्हा दाखल केला असून गणेश बोड्डु हे सातत्याने माहिती अधिकार अर्ज दाखल करून दबाव तंत्राचा वापर करतात,वकिलाकडून नोटीस पाठवतात आणि त्यातूनच त्यांनी या कार्यालयात कार्यरत असलेल्या श्रीमती किर्ती देऊळकर व त्यांचे पती श्री. ड. शेखर खडतरे व त्यांचे पतीचे मित्र समाजसेवक श्री.विठल वनमारे यांची भेट घेऊन मला एकुण 10 लाख रुपये व दर महिण्याला 50 हजार रुपये दयावे लागतील अशी मागणी केली असल्याचे सांगत गणेश बोड्डू विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
   
या घटनेमुळे सोलापुरातील सहाय्यक कामगार आयुक्त निलेश यलगुंडे पुन्हा चर्चेत आले असून कोरोना त्यांच्या कार्यपद्धती बद्दल नाराज असलेले सामाजिक कार्यकर्ते आणि कामगारांच्या हितासाठी कार्यरत असणारे सामाजिक कार्यकर्ते यांनी मात्र संतापाचा सूर आळवत गणेश बोड्डू यांनी खरंच खंडणी मागितली होती का नाही हे कोर्टात सिद्ध होईलच पण कोरोना आणि लॉकडाऊन मुळे प्रचंड अडचणीत असलेल्या कामगार वर्गाच्या अनेक नोंदणी बाबत आणि बोगस कामगार नोंदणी बाबत घेण्यात येत असलेल्या आक्षेपाबाबत कायम कानाडोळा करत मनमानी केली आहे अशीच भावना व्यक्त होत आहे.
कोरोना काळात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असताना सोलापूर महानगर पालिकेच्या आयुक्तांनी यलगुंडे यांच्यावर सर्वेक्षणाची जबाबदारी दिलेली असताना मात्र यात हलगर्जी पणा केल्यामुळे निलेश येलगुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश तत्कालीन महापालिका आयुक्तांनी दिले होते.तर शिवसेनेचे कामगार नेते विष्णू कारमपुरी यांनी देखील निलेश यलगुंडे आणि त्याचे सहकारी याच्याकडून करण्यात आलेल्या बोगस कामगार नोंदणीची चौकशी करून यलगुंडे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली होती.
पंढरपूर शहर आणि तालुक्यातही काही वजनदार राजकीय कार्यकर्ते आणि नगरसेवक यांनी वशिलेबाजीने बांधकाम कामगार म्हणून इतर व्यवसाय उद्योगात कार्यरत असलेल्या लोकांची नावे बांधकाम कामगार म्हणून समाविष्ट केली आहेत असा आक्षेप सातत्याने घेण्यात येत होता व पंढपुरात त्याची सातत्याने चर्चाही होत होती.या बाबत मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी यलगुंडे यांच्याशी संपर्क केला असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली होती.तर पंढरी वार्ताकडून कडून यलगुंडे यांच्याशी संपर्क साधत पंढरपूर शहरात नोंदणी करण्यात आलेल्या बांधकाम कामगारांची माहिती मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली असता यलगुंडे यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली होती.त्यामुळे सध्या गणेश बोड्डू हे सातत्याने माहिती अधिकार अर्ज दाखल करतात,तिऱ्हाईत व्यक्तीसमोर खंडणीची मागणी करतात अशी फिर्याद सह.कामगार आयुक्त यलगुंडे यांनी दाखल केली असली तरी यलगुंडे यांनी आपल्या कार्यपद्धतीचे आणि आपण लोकसेवक आहोत याचेही भान ठेवत कोरोनामुळे खचलेल्या पिचलेल्या कामगार वर्गास न्याय आणि लाभ मिळवून देण्यासाठी सक्षमपणे भूमिका पार पाडावी आणि पंढरपुरातील नोंदणीकृत बांधकाम कामगार किती खरे किती खोटे याची पडताळणी करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *