गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मोलकरणीने चक्क तिजोरीच पळवली; ज्येष्ठ दाम्पत्याच्या घरी 25 लाखाची चोरी

घरकाम करणाऱ्या महिलेने तीसऱ्याच दिवशी सोन्याचे दागिणे, रोकड, विदेशी चलन असलेली 23 लाख 53 हजाराची डिजीटल तिजोरी घेऊन पळ काढला. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 27 ते 30 जुलै या कालावधीत बोराडेनगर वानवडी परिसरातील एका सोसायटीत घडली आहे. मोलकरणीला डिजिटल तिजोरी उघडता न आल्याने तीने तिजोरीच घेऊन पळ काढला असल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी(73) व त्यांच्या पत्नी वानवडीतील बोराडेनगर परिसरात गुलमोहर सोसायटीत राहतात. त्यांची मुले नोकरीनिमीत्त बाहेरगावी असल्याने घरात दोघेच जण असतात. एक महिला 27 जूलै रोजी त्यांच्याकडे काम मागण्यासाठी आली होती.

त्यांनाही घरकामासाठी महिलेची आवश्‍यकता असल्याने त्यांनी तिला कामाला ठेवून घेतले. मात्र, तिला कामाला ठेवून घेताना त्यांनी तिची काहीही माहिती घेतली नव्हती. शिवाय मोबाईल नंबरही घेतला नाही. दोन दिवस काम पाहिल्यानंतर त्यांना तिचे काम चांगले वाटले.

दरम्यान, फिर्यादी यांच्या पत्नीने वारंवार तिच्याकडे आधारकार्ड मागितले होते. परंतू कामाच्या गडबडीत घरी विसरले आहे असे सांगून तीने ते दिले नाही . सुरुवातीचे दोन दिवस तीने व्यवस्थित काम केले. मात्र 30 जुलैला दुपारी चार वाजता ती काम करुन निघून गेली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 31 जुलै रोजी परत कामाला आलीच नाही. त्यांनी ज्या व्यक्तीने तिला त्यांच्याकडे कामासाठी पाठवले होते, त्यांच्याकडे चौकशी केली पण त्यांनी देखील तिचा पत्ता किंवा संपर्क क्रमांक माहित नव्हता.

संशय आल्यामुळे फिर्यादी यांच्या पत्नीने लोखंडी कपाटात ठेवलेली तिजोरी पाहिली. तेव्हा त्यांना तिजोरी जागेवर आढळून आली नाही. त्यांच्या या तिजोरीला बायोमेट्रिक कुलूप आहे. तिजोरीत 532 ग्रॅम वजनाचे 24 लाख 23 हजार 500 रुपयांचे सोन्याचे दागिने, 55 हजार रुपये रोख, 500 अमेरिकन डॉलर, 4 हजार दुबई दिनार असे परदेशी चलन व 10 हजार रुपयांची तिजोरी असा 24 लाख 88 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *