गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मुख्याध्यापकास शिक्षकाची लाथाबुक्क्यांनी मारहाण

शिक्षण सेतू अभियानाचे काम सांगितल्याचा राग आल्याने विसापूर शासकीय आश्रमशाळेतील प्राथमिक शिक्षक अनिल देसले यांनी मुख्याध्यापक रवींद्र मानकर यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या गंभीर प्रकरणाची त्वरित दखल घेऊन प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी विकास मीना यांनी देसले यांच्या कामकाजाची चौकशी केली. त्यात प्रथमदर्शनी देसले दोषी आढळल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

कळवण तालुक्यातील विसापूर शासकीय आश्रमशाळेतील मुख्याध्यापक रवींद्र मानकर यांनी एकात्मिक प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी विकास मीना यांच्याकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शासनाच्या निर्देशानुसार नव्याने अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेल्या शिक्षण सेतू अभियानाचे सर्व शिक्षक वर्गात समसमान वाटप करण्यात आले आहे. त्यानुसार प्राथमिक शिक्षक अनिल देसले यांनाही काम देण्यात आले.

मात्र, काम करण्यास नकार देऊन टाळाटाळ करत होते. त्यांना हे काम करण्यास सांगितले असता त्यांनी ‘हे काम माझे नाही, मी करणार नाही,’ अशी अरेरावीची उद्धट भाषा वापरली. शासकीय कामकाजात अडथळा आणून मला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. दोन वेळा टेबल लोटून भिंतीवर मला दाबून धरले. हा सर्व गोंधळ बघून इतर सहकारी शिक्षक मदतीला धावून आले. त्यांनी देसलेंना पकडून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी “मला सोडा, आज मी याला जिवंत सोडणार नाही,’ अशी धमकी दिल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *