ताज्याघडामोडी

पोलीस उपायुक्तांकडून फुकट बिर्याणीच्या मागणीचा ऑडिओ व्हायरल, गृहमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

पुणे शहरातील टिळक रस्त्यावरील एका उपाहारगृहातून कर्मचाऱ्याला फुकट बिर्याणी आणण्यास सांगितल्याची पोलीस उपायुक्तांची ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. हद्दीतील उपाहार गृहचालकाला पैसे कशाला द्याायचे, असे उपायुक्तांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला सांगितल्याचे ध्वनीफितीतून उघड झाले आहे. या प्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस आयुक्तांना दिले आहेत. दरम्यान, संबंधित पोलीस उपायुक्तांनी ध्वनीफितीत तांत्रिक छेडछाड केली असल्याचा दावा केला असून सायबर पोलिसांकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महिला पोलीस उपायुक्तांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याला टिळक रस्त्यावरील उपाहारगृहातून बिर्याणी आणण्यास सांगितले.

तेव्हा कर्मचाऱ्याने मॅडम साजूक तुपातील बिर्याणी आणू का?, असे त्यांना विचारले. बिर्याणीचे पैसे कसे देणार असे मॅडमने संबंधिताला विचारले. तेव्हा बिर्याणी घेतल्यानंतर उपाहारगृहात पैसे देतो, असे कर्मचाऱ्याने त्यांना सांगितले. तेव्हा हद्दीतील उपाहारगृहचालकाला पैसे कशाला द्याायचे, अशी विचारणा उपायुक्तांनी केल्याचा ऑडिओ व्हायरल झाला आहे. संबंधित कर्मचारी आणि उपायुक्तांमधील संभाषण व्हायरल झाल्यानंतर पोलीस दलात खळबळ उडाली.

याप्रकरणाची गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गंभीर दखल घेतली असून पोलीस आयुक्तांकडून चौकशी करण्यात येईल, असे आदेश दिले. दरम्यान, संबंधित ध्वनीफित खोडसाळपणे प्रसारित केली असून त्यात काही तांत्रिक बदल किंवा छेडछाड करण्यात आल्याचा (मॉर्फ) दावा केला आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्यातील एक कर्मचारी हप्तेखोरी करत होता. त्याच्यावर कारवाई केल्याने गैरप्रकारांना आळा बसला होता. माझ्यावर रोष होता माझी बदली व्हावी तसेच माझ्यावर कारवाई होऊन मी अडचणीत यावे, या हेतूने ध्वनीफित प्रसारित केल्याचा दावा उपायुक्तांनी केला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *