ताज्याघडामोडी

आमच्याकडे 50 % करकपातीची मागणी करत होता, आता सत्तेत आल्यावर तुटपुंजी कपात का

पेट्रोल-डिझेल दरावरुन अजित पवारांचा हल्लाबोल

महाविकास आघाडी सरकारकडे 50 टक्के करकपातीची मागणी करत होतात. आता सत्तेत आल्यानंतर तटपुंजी कपात का केली? असा सवाल माजी उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी पेट्रोल-डिझेल दरावरुन उपस्थित केलाय.

ते पुण्यात बोलत होते. शिंदे सरकारकडून गुरुवारी राज्यातील पेट्रोलच्या करात पाच रुपये प्रति लीटर आणि डिझेलच्या करात तीन रुपये इतकी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. या दरावरुन अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना जाब विचारलाय.

पेट्रोल आणि डिझेलवरील काही प्रमाणात टॅक्स कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मी अडीच वर्ष अर्थमंत्री राहिलोय. मागील अर्थसंकल्पात गॅसच्या किंमती प्रचंड प्रमाणत कमी केल्या होत्या. साडेतेरा टक्केंचा टॅक्स तीन टक्केंवर आणला होता. यामुळे हजार कोटींचा भार राज्य सरकारने उचलला होता. त्यावेळी विरोधी पक्षात असणारे हे लोक मागणी करत होते की, ‘राज्य सरकार पेट्रोल आणि डिझेलला जितका टॅक्स लावते, ते 50 टक्के करा.’

विरोधात असताना मागणी करत होते, आता सत्तेत आल्यानंतर त्यांनी 50 टक्के टॅक्स कमी का नाही केला? जर 50 टक्के कर कपात केली असती तर डिझेलची किंमत 11 रुपये आणि पेट्रोलची किंमत 17 रुपयांनी कमी झाली असती. पण त्यांनी तसे केलेच नाही. विरोधात असताना मागणी करायची, अन् निर्णय घेण्याची वेळ आल्यावर पळवाट काढायची.

आज तीन आणि पाच रुपयांने किंमत कमी केली आहे. पण पुढील काही दिवसांत केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेल सातत्याने वाढवतेच. गॅस सिलिंडर वाढवतेच. त्यामुळे सर्वसामान्यांना झळ बसत आहे. आपण इतका टॅक्स कमी करुन देखील सीएनजीचा वापर करणारे ऑटो रिक्षावाले, टॅक्सीवाले, चारचाकी वाले सगळे भेटतात अन् म्हणतात की, ‘एकीकडे तुम्ही टॅक्स कमी करता अन् दुसरीकडे केंद्र सरकार वाढवते, आम्हाला काहीच फायदा होत नाही. ‘ पूर्वीचं बरं म्हणण्याची वेळ आली आहे, अशा प्रकराचं चित्र आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *