ताज्याघडामोडी

अस्मानी संकटाचा विठुरायाच्या ५१ फूट उंच प्रतिमेसही फटका

राज्यभरात पावसाने धुमशान घातले आहे. कोकण, सांगली, सातारा आणि कोल्हापूरमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. अनेकांचे संसार हे उघड्यावर पडले आहे. तर दुसरीकडे या अस्मानी संकटाने देवाला सुधा बाधा पोहोचवली आहे. जालन्यात वादळी वाऱ्यामुळे 51 फुटी विठ्ठलाची मूर्ती कोसळली आहे.

परतूर तालुक्यातील वाटूर फाटा येथील आर्ट ऑफ लिव्हिंग केंद्रात 51 फूट उंच विठ्ठलाची मूर्ती उभारण्यात आली होती. आज दुपारी आलेल्या वादळाचा तडाखा या विठ्ठलाच्या मूर्तीला बसला.वादळी वाऱ्याचा वेग इतका होता की, त्यामुळे विठ्ठलाची मूर्ती समोरच्या बाजूला झुकन खाली आली. या दुर्घटनेत सुदैवाने कोणालाही इजा नाही. वादळी वाऱ्यामुळे मूर्ती पडली असून इतर अफवांवरती विश्वास न ठेवण्याचे संस्थानाच्या वतीने आवाहन करण्यात आलं आहे.

आर्ट ऑफ लिव्हिंगचे समन्वयक डॉ. पुरुषोत्तम वायाळ यांनी ‘ही एक नैसर्गिक आपत्ती होती. यात कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. त्यामुळे या करिता सर्वांना विनंती आहे की नैसर्गिक आपत्तीमुळे आलेल्या चक्रीवादळात ही विठ्ठलाची मूर्ती खाली आली आहे. तरी सर्वांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता कुठल्याही अफवा पसरू नये’ अशी नम्र विनंती केली आहे.

वाटूरमधील 51 फूट उंच विठ्ठलाची मूर्ती ही अत्यंत मनमोहक आणि सर्वांना आकर्षित करणारी होती. मोठ्या भक्तीभावाने आषाढी एकादशीला भाविकांनी या परिसरात गर्दी केली होती. 51 फुटी मूर्ती पाहण्यासाठी अनेक भाविक या ठिकाणी भेटी देत होते. पण, वादळी वाऱ्यामुळे मूर्ती कोसळल्यामुळे भाविकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *