ताज्याघडामोडी

पुढच्या २४ तासात अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाकडून इशारा

 महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दोन दिवसांपासून तुफान वेगाने कोसळणारा पाऊस पुढचे दोन दिवस देखील असाच किंबहुना अतिमुसळधार कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकण, गोवा आणि किनारपट्टीला लागून असलेल्या पश्चिम घाट, तसेच मध्य महाराष्ट्रातील काही भागामध्ये २३ जुलै आणि २४ जुलै या दोन दिवसांमध्ये अतिमुसळधार पाऊस होणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. रायगड, रत्नागिरी, ठाणे या जिल्ह्यांमध्ये कालपासून कोसळणाऱ्या पावसाने पुरती वाताहत केली असून आत्तापर्यंत पावसामुळे राज्यभरात ४४ मृत्यू झाल्याची माहिती समोर आल्यामुळे हवामान विभागाच्या या अंदाजानंतर प्रशासकीय यंत्रणा अधिकच सतर्क झाल्या आहेत.

रायगड जिल्ह्यातील तळई गावात दरड कोसळून ३२ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्यापाठोपाठ सुतारवाडीमध्ये देखील अशाच घटनेमध्ये ४ जणांचे जीव गेले आहेत. त्यामुळे एकट्या रायगडमध्ये आत्तापर्यंत पावसामुळे दरड कोसळून ३६ मृत्यूंची नोंद झाली आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रात हा आकडा ४४ च्या घरात गेला असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. त्यामुळे पावसाचे अक्राळ-विक्राळ रुप राज्याच्या काही भागांमध्ये आधीच थैमान घालत असताना पुढच्या २४ तासांमध्ये देखील हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *