गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पोलिसांच्या रखवालीतून कैद्याचे पलायन; पोलीस उपनिरीक्षकासह पाच जण निलंबीत

अभिवचन रजा (तातडीची रजा) कालावधीत कैद्याने पोलिसांच्या रखवालीतून पलायन केल्याप्रकरणी पुण्यातील कोर्ट कंपनीच्या पोलीस उपनिरीक्षकासह पाच जणांना निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. खात्याअंतर्गत केलेल्या प्राथमिक विभागीय चौकशीत दोषी आढळल्यानंतर संबंधिताविरूद्ध कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस उपनिरीक्षक सचिन प्रल्हाद निबांळकर, पोलिस हवालदार बाळु रामचंद्र मुरकुटे, शरद नाथा मोकाते, महावीर लक्ष्मण सामसे, किशोर चंद्रकांत नेवसे अशी निलंबित करण्यात आलेल्यांची नावे आहे. अपर पोलिस आयुक्त जालिंदर सुपेकर यांनी निलंबनाचे आदेश दिले आहेत. वेदप्रकाशसिंग विरेंन्द्रकुमार सिंग (मु.पो.गोलवरा उत्तरप्रदेश) असे पलानय केलेल्या कैद्याचे नाव आहे.

आरोपी वेदप्रकाशसिंग येरवडा कारागृत एका गुन्ह्यात शिक्षा भोगत होता. मुलीच्या लग्नासाठी त्याला मुळगावी गोलवारा ( रा. जि. सुलतानपुर) उत्तरप्रदेश येथे हजर राहण्यासाठी 7 दिवसाची तातडीची अभिवचन रजा कारागृह उपमहानिरीक्षक येरवडा पश्चिम विभाग पुणे यांनी मंजूर केली होती. त्यानुसार वेदप्रकाशसिंगला लग्नकार्यास हजर ठेवण्यासाठी कारागृहाकडून आरोपी पार्टीसाठी मागणीपत्र मिळाले होते. त्यानुसार कोर्ट कंपनीच्या अधिकाऱ्यासह कर्मचारी आरोपी वेदप्रकाशसिंग याला घेऊन त्याच्या गावी गेले होते.

मुलीच्या लग्नानंतर 15 मे रोजी पहाटे पाच ते सहाच्या सुमारास आरोपी वेदप्रकाशसिंग याने राहत्या घराच्या खिडकीच्या लोखंडी गजाचे स्क्रू काढून जाळी कापून पलायन केले. प्राथमिक विभागीय चौकशीत पोलिसांच्या बेजबाबदार व हलगर्जीपणामुळे कैद्याने पलानय केल्याचे उघडकीस आले. कर्तव्यात गंभीर चूक केल्यामुळे आणि पोलिस दलाची प्रतिमा मलीन झाल्याचा ठपका ठेवत संबंधितांना निलंबीत केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *