ताज्याघडामोडी

ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा; वडेट्टीवारांचं मोठं विधान

नागपूर: ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मोठं विधान केलं आहे. आम्ही मंत्री असलो तरी ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. तसेच निवडणुका न घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. ही चर्चा सकारात्मक होती, असा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे.

त्यामुळे ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत निवडणुका न घेण्याबाबत मुख्यमंत्रीही सकारात्मक असल्याची जोरदार चर्चा आहे. (No elections till OBC reservation is restored, says vijay wadettiwar)

विजय वडेट्टीवार यांनी मीडियाशी बोलताना ही माहिती दिली. भाजपने ओबीसी आरक्षणावर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. पण भाजपच्या आंदोलना आधीच निवडणुका न होऊ देण्याचा आम्ही इशारा दिला आहे. त्यामुळे आता भाजपचे वरातीमागून घोडे आहेत, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. तसेच ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत निवडणुका होऊ नये या मुद्दयावर आम्ही ठाम आहोत. मुख्यमंत्र्यांशी या संदर्भात चर्चा झाली असून ही चर्चा सकारात्मक झाली आहे, असा दावाही त्यांनी केला.

लोणावळ्यात चिंतन बैठक

ओबीसी आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी येत्या 26 आणि 27 जून रोजी लोणावळ्यात चिंतन बैठक होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. आम्ही इम्पिरिकल डेटाबाबत केंद्राकडे आम्ही मागणी केली आहे. केंद्राकडून हा डेटा मिळावा ही अपेक्षा आहे. तसेच डेटा गोळा करण्याचं काम आयोगाला देण्यात आलं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मुंबई लोकल सुरू होणार नाहीच

मुंबईची लोकल कधी सुरू होणार?, असा सवाल वडेट्टीवार यांना करण्यात आला. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कोरोना संपेपर्यंत मुंबईत लोकल सुरू होणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

साडेतीन वर्षे उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री

आमदार प्रताप सरनाईक यांनी लिहिलेल्या पत्रानंतर शिवसेना पुन्हा भाजपसोबत जाण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यावर काहीही झालं तरी पुढचे साडेतीन वर्षे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहणार आहेत. कितीही ईडी आणि सीबीआयचा दबाव आणला तरी तुम्ही स्वप्न बघत राहा. आमची वाटचाल सुरूच राहील, असं त्यांनी सांगितलं. केंद्रीय संस्था कशाप्रकारे वागत आहेत, हे दाखवण्यासाठी सरनाईक यांचे हे पत्र आहे. असं मला वाटतेय, असा चिमटाही त्यांनी काढला.

मृत्यूला आमंत्रण देऊ नका

राज्यातून कोरोना गेलेला नाही. काही जिल्ह्यात अजूनही कोरोनाची चिंताजनक स्थिती आहे. त्यामुळे स्वत:हून मृत्यूला आमंत्रण देऊ नये. सर्वांनी कोरोनाचे नियम पाळावेत, असं आवाहन त्यांनी केलं. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *