ताज्याघडामोडी

तक्रार आल्यानंतर आता दहा मिनिटात पोचणार पोलीस

 

राज्य सरकारने संपूर्ण राज्यभर आता डायल 112 हा तंत्रज्ञानावर आधारित उपक्रम राबवण्याची योजना आखली आहे. त्यानुसार एखाद्या नागरिकाने तक्रार केल्यास शहरी भागात केवळ दहा मिनिटांत पोलीस तेथे पाहोचतील आणि ग्रामीण भागात पंधरा मिनिटांमध्ये पोलीस तेथे पोहचतील अशी व्यवस्था केली जात आहे.

गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे. या प्रकल्पानुसार राज्यातील सर्व 45 पोलीस आयुक्तालयांमध्ये आणि जिल्हा पोलीस कार्यालयांमध्ये आधुनिक पोलीस नियंत्रण कक्ष स्थापन केले जातील.

पोलिसांकडे असलेल्या 1502 चार चाकी गाड्या आणि 2269 दुचाकी गाड्यांना मोबाइल डाटा टर्मिनल बसवले जाईल.

जीपीएस सिस्टीमही या वाहनांवर कार्यान्वित केले जाईल. सध्या 849 चार चाकी गाड्या आणि 1372 दुचाकी गाड्यांना ही यंत्रणा बसवण्यात आली आहे. ही सिस्टीम टेक्‍निकली फुलप्रफ आहे, असा दावाही मंत्र्यांनी केला आहे.

या यंत्रणेमुळे पोलीस व्यवस्था सतत लोकांसाठी कार्यरत राहणार आहे. हे तंत्रज्ञान वापरण्यासाठी राज्यातील पंधरा हजार पोलीस कर्मचाऱ्यांना त्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. डायल 112 उपक्रमामुळे लोकांना पोलिस व्यवस्थेची मदत त्वरित आणि हमखास पद्धतीने मिळू शकणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या एका बैठकीत या योजनेच्या प्रगतीचा नुकताच एक आढावा घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लवकरच या प्रकल्पाचे उद्‌घाटन होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *