ताज्याघडामोडी

खासदार संभाजीराजे छत्रपती यांचं नक्षलवाद्यांना भावनिक आवाहन

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबतचा कायदा रद्द केल्यापासून वेगवेगळ्या भूमिका मांडल्या जात असून, छत्रपती संभाजीराजे यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्याबाबत पत्रक काढण्यात आले असून, मराठा समाजाने दलाल नेत्यांपासून सावध राहावे, असा इशारा त्यामध्ये दिला आहे. या पत्राची दखल घेत खासदार संभाजीराजें छत्रपती यांनी नक्षलवाद्यांना उद्देशून एक पत्र लिहिलं आहे.

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची साक्ष देऊन मराठा समाजाला भुरळ पाडण्याचा प्रयत्न नक्षलवादी संघटना करत असल्याचे माझ्या वाचनात आले. ‘मराठ्यांनो, आम्ही तुमची वाट पाहत आहोत’ असे ते म्हणाले आहेत. ‘उलट मराठा समाजाचा घटक किंवा त्याच स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज या नात्याने, मी त्यांनाच आवाहन करतो. नक्षलवाद्यांनो,या आम्हीच तुमची वाट पाहत आहोत. या, सामील व्हा मुख्य प्रवाहात’, असं आवाहनही संभाजीराजेंनी नक्षलवाद्यांना केलं आहे.

‘भारताने लोकशाही व्यवस्था स्वीकारली आहे. शिवाजी महाराजांचा राज्यकारभार बारकाईने पाहिला, तर अष्टप्रधान मंडळ स्थापून, त्यांनी लोकशाहीचेच बीजारोपण केले होते. त्यांचा रक्ताचा आणि वैचारिक वारसदार या नात्याने मी आपल्याला आवाहन करू इच्छितो, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या नागरिकांच्या, इथल्या हजारो वर्षांच्या संस्कृतीला अनुसरूनच भारतात लोकशाही राज्य व्यवस्था केली. तुम्ही सुद्धा तिचे पाईक व्हा.मराठा समाजाने शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत भूमिका निभावली होतीच. त्यांच्या नंतर सुद्धा परकीय शक्तींचा पाडाव करण्यासाठी मराठा समाजाने आपले सातत्याने बलिदान दिलेले आहे.’

‘मला मान्य आहे, की स्वातंत्र्यानंतर मराठा समाजावर अन्याय झाला आहे. त्याबाबत आम्ही याच लोकशाही व्यवस्थेत लोकशाही मार्गानेच आमचे हक्क मागत आहोत. न्यायालयीन लढाई, आंदोलने, मोर्चे, चर्चा, लाँग मार्च इ. मार्ग आम्ही स्विकारत आहोत. अवघ्या जगाने आमच्या मूक मोर्चांची दखल घेतली होती. आम्हाला विश्वास आहे की आम्ही आरक्षणही मिळवू आणि समाजाचे इतर प्रश्नही सोडवू’, असा विश्वासही संभाजीराजे यांनी व्यक्त केला आहे.

‘काही लोक या लोकशाही व्यवस्थेत चांगले नसतीलही, पण म्हणून संपूर्ण व्यवस्थाच कुचकामी आहे,असे नसते. लोकांना शिक्षित करून, चांगल्या वाईट गोष्टींची जाणीव करून देऊन मतपेटीच्या साहाय्याने पर्याय उभा करून देण्यातच संपूर्ण राष्ट्राची भलाई आहे’, असं खासदार संभाजीराजे यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *