ताज्याघडामोडी

मोदी सरकारची शेतकऱ्यांसाठी खूशखबर! खरीप हंगामासाठी MSP मध्ये घसघशीत वाढ

नवी दिल्ली, 09 जून : केंद्र सरकारने बुधवारी खरीप पिकांवर किमान आधारभूत किंमत वाढीस परवानगी दिली आहे. खरीप पिकासाठी सरकारने हमीभावात 50 ते 62 टक्के वाढ केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तिळाच्या MSP मध्ये (452 ​​रुपये प्रतिक्विंटल) सर्वाधिक वाढ झाली असल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे. तिळानंतर तूर आणि उडीदसाठी (दोन्ही 300 रुपये क्विंटल) सर्वाधित MSP ठरवण्यात आली आहे.

बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणखी बरेच निर्णय घेण्यात आले, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.

त्यांनी सांगितले की, वर्ष 2021-22 हंगामातील खरीप पिकांची एमएसपी मंजूर करण्यात आली आहे. मागील वर्षांच्या तुलनेत यावेळी तिळाच्या एमएसपीमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. तिळासाठी प्रति क्विंटल 452 रुपये किंमत देण्यात आली आहे. याशिवाय तूर आणि उडीदसाठी प्रति क्विंटल 300 रुपये दर देण्याची शिफारस केली आहे.

केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर म्हणाले की, केंद्र सरकार गेल्या सात वर्षांपासून सातत्यानं शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत असून त्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी नेहमी तयार आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी हे सरकार कटिबद्ध आहे. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिपरिषदेच्या बैठकीत खरीप पिकांचे एमएसपी जाहीर करण्यात आले आहेत, असे ते म्हणाले.

सर्वसाधारण किंमतीच्या तांदळाचा दर 1,868 रुपये प्रति क्विंटल होता. वर्ष 2021-22 मध्ये त्याची किंमत 1,940 रुपये प्रति क्विंटल करण्यात आली आहे. MSP म्हणजे असा दर ज्या दराने सरकार शेतकऱ्यांकडून अन्नधान्य खरेदी करते. यंदा शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य भाव मिळावा या दृष्टीने MSP मध्ये सरकारने वाढ केल्याचे सांगण्यात येत आहे. आज होणाऱ्या MSP साठीच्या केंद्रीय बैठकीकडे शेतकऱ्यांसह शेतकरी नेत्यांचे लक्ष लागून होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *