ताज्याघडामोडी

कोरोनावर मात करुन मुलगा घरी आला, रुग्णालयातून आईला फोन, तुमचा मुलगा वारला!

सातारा: कोरोना काळात आरोग्य यंत्रणेच्या गलथान कारभाराची अनेक प्रकरण समोर आली आहेत. सातारा जिल्हयात फलटण येथील 20 वर्षीय युवकाला कोरोनामुळे जिवंतपणी मृत घोषित करण्याचा भोगंळ कारभार घडला आहे. आरोग्य यंत्रणेच्या भोंगळ कारभाराची सातारा जिल्ह्यात चर्चा आहे. तर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी चौकशी करुन कारवाई करणार असल्याचं सांगितलं आहे.

चित्रपटाच्या कथानकाला लाजवेल असा प्रकार

सातारा जिल्हयातील फलटण येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

कोरोनावर उपचार घेऊन पूर्णपणे बरा झालेल्या युवकाला त्याचा कोरोनाने मृत्यू झाल्याचा फोन प्रशासनाकडून आल्याने संबधित युवकाचे कुटुंबीय हवालदिल झाले आहे. एखाद्या हिंदी चित्रपटाच्या कथानकाला साजेसी ही अशी सत्यघटना फलटण शहरातील मंगळवार पेठेत घडली आहे. सिद्धांत मिलिंद भोसले वय 20 असे या युवकाचे नाव आहे.

मे महिन्यात सिद्धांतला कोरोना

मे महिन्यात सिद्धांतची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. यानंतर युवकाने खासगी रुग्णालयात उपचारही घेतले होते. गेल्या महिन्याभरापासून तो ठणठणीत बरा झाला होता. दोन दिवसापुर्वी 7 जुनला कोरोनाने मृत्यू झालेल्या यादीत संबधित युवकाचे नाव आले. त्यानंतर आरोग्य यंत्रणेकडून सिद्धांत भोसले याच्या आईला त्यांचा मुलगा मृत झाल्याचा फोना आला. या प्रकारामुळे आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आहे.

फलटणच्या आरोग्य यंत्रणेविषयी संताप

धक्कादायक बाब म्हणजे सिध्दांत भोसले या युवकाच्या आईला तुमचा मुलगा मयत झाला असल्याचा फोन प्रशासनाकडून आल्यामुळे फलटण येथील आरोग्य यंत्रणेबाबत संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत संबधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी जनसामान्यातून केली जात आहे.

चौकशी करुन कारवाई करणार

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांच्याकडे या प्रकाराबद्दल विचारणा केली असता त्यांनी चौकशी करुन कारवाई करु, असं म्हटलं. आरोग्य यंत्रणेतील जे घटक याला जबाबदार असतील त्यांना पाठिशी घातले जाणार नाही, असं सुभाष चव्हाण यांनी सांगितलं. त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचंही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *