ताज्याघडामोडी

कोरोनाची लस तुम्हाला किती दिवस सुरक्षित ठेवेल? जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ

नवी दिल्ली, 1 जून: भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण मोहिमेचा वेग वाढवण्यात येत आहे. आतापर्यंत देशात 21.58 कोटी लोकांचं लसीकरण पूर्ण झालंय. देशात सध्या तीन लसींच्या वापरास परवानगी देण्यात आली आहे. सिरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशिल्ड, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि रशियाची स्पुटनिक. या सर्वच लसींचे दोन डोस दिले जातात.

कोव्हिशिल्ड लसीच्या दोन डोसदरम्यान 12-16 आठवड्यांचं अंतर ठेवण्यात यावं. तर, कोव्हॅक्सिन लसीच्या दोन डोसमध्ये 4-6 आठवड्यांचं अंतर असावं. तसेच स्पुटनिक Vच्या दोन डोसदरम्यान, 21-90 दिवसांचं अंतर ठेवण्यास केंद्र सरकारने सांगितलंय.

कोरोनाचे दोन्ही डोस घेतल्यानंतर रोग प्रतिकारशक्ती तयार होण्यास किती दिवस लागतील?

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे डॉ. कॅथरीन ओब्रायन म्हणतात, की पहिल्या डोसनंतर दोन आठवड्यात रोग प्रतिकारशक्ती तयार होण्यास सुरुवात होते. तसेच दुसर्‍या डोसनंतर त्यापेक्षाही चांगल्या प्रकारे रोगप्रतिकार शक्ती तयार होते. जी लस घेतलेल्या व्यक्तीला आणखी स्ट्राँग करते.

रोग प्रतिकारशक्ती किती दिवस राहील?

लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही किती दिवस प्रतिकारशक्ती राहील हे अद्याप संशोधकांनाही माहिती नाही. डॉ. कॅथरिन म्हणाल्या, की याबाबत स्पष्ट माहिती मिळण्यास अद्याप काही वेळ लागेल. “आम्ही लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांवर लक्ष ठेऊन आहोत. त्यांची रोगप्रतिकारशक्ती किती दिवस राहते, आणि ते किती दिवस या आजारापासून सुरक्षित राहतात, याचा आम्ही अभ्यास करत आहोत. हे संशोधन पूर्ण होईपर्यंत आपल्याला याबाबत स्पष्ट माहिती मिळणार नाही”, असे कॅथरिन म्हणाल्या.

दरम्यान, आम्हाला सध्या हे माहिती आहे की फायझरचे (Pfizer) दोन्ही डोस घेतल्यानंतर त्यांचा परिणाम सहा महिने किंवा त्याहून अधिक काळ राहतो. तसेच, मॉडर्नाची (Moderna) लस घेतल्यानंतरही त्या अँटीबॉडीज शरीरात सहा महिन्यांनंतरही दिसून आल्या आहेत. कोव्हिशिल्ड ही लस सध्या भारतात दिली जात आहे. तिचा परिणाम हा साधारणपणे एक वर्ष किंवा त्याहून अधिक राहण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. “सध्या ऑक्सफोर्डच्या ChAdOx1 या फॉर्म्युलावर आधारित ज्या लसी बनवण्यात येत आहेत, त्या सर्वांचा परिणाम पुढे एक वर्षांपर्यंत राहू शकेल, असा आमचा अंदाज आहे”, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नव्या व्हेरियंटमुळे इम्युनिटी कमी होते का?

कोरोनाचे अनेक नवे व्हेरियंट जगभरात आणि भारतात सापडले आहेत. भारतात प्रथम B.1.617.1 आणि B.1.617.2 आढळले होते. या व्हेरियंटच्या विरूद्ध लस प्रभावी असल्याचं आढळून आलं आहे. मात्र, शास्त्रज्ञांचे म्हणणं आहे की दोन डोस घेतल्यानंतर तिसरा बूस्टर शॉट आवश्यक आहे.

कोव्हॅक्सिन तयार करणाऱ्या भारत बायोटेकने बूस्टर डोससाठी चाचण्या सुरू केल्या आहेत. सप्टेंबर ते ऑक्टोबर 2020 दरम्यान ज्या स्वयंसेवकांना लस देण्यात आली होती त्यांना सहा महिन्यांनी बूस्टर डोस दिला जातोय.

द न्यूयॉर्क टाईम्सच्या अहवालात अलिकडेच झालेल्या दोन अभ्यासांचा उल्लेख करत सांगितलंय की, कोरोनातून बरे झाल्यानंतर तयार झालेली प्रतिकारशक्ती किमान एक वर्ष टिकते. लसीकरणानंतर शक्यतो ती आयुष्यभर टिकू शकते. म्हणजेच कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तीने लसीचे दोन डोस घेतल्यानंतर बूस्टर शॉटची अजिबात गरज नाही.

लसीकरणानंतर कोरोना होऊ शकतो का?

लसीकरणानंतर कोरोनाची लागण होणार नाही, अशी गॅरंटी नाही. कोरोना व्हायरस नवीन असून तो म्युटेट होतोय, त्यामुळे त्याबद्दल सांगणं कठीण आहे. एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले, “हा विषाणू सतत बदलतोय. त्यामुळे लस ही प्रत्येक व्हेरियंटवर प्रभावी असेलच याबद्दल आम्ही खात्रीपूर्वक काहीही सांगू शकत नाही. मास्क आणि सुरक्षित अंतर हे सर्वच व्हेरियंटवर प्रभावी असल्याचं ते सांगतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *