ताज्याघडामोडी

आता केशरी शिधापत्रिकाधारकांनाही सवलतीत अन्नधान्य मिळणार – छगन भुजबळ

मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना व शेतकरी योजनेअंतर्गत सामाविष्ट न झालेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्यांचे सवलतीच्या दरात जूनमध्ये वाटप होणार असल्याची माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना करतानाच राज्य सरकारने अन्न धान्य मोफत वाटण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. मागच्या लॉकडाऊनच्या काळात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत तसेच शेतकरी योजनेअंतर्गत सामाविष्ट न झालेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ देण्यात आला होता.

या योजनेअंतर्गत पुन्हा जूनमध्ये अन्नधान्य वितरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याची माहिती राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

राज्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत अन्नधान्यांचे राज्यात मोफत वितरण चालू आहे. त्याचबरोबर आता एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांनाही जुन महिन्यात प्रतिव्यक्ती 1 किलो गहू व 1 किलो तांदूळ याप्रमाणे 2 किलो अन्नधान्य सवलतीच्या दरात वाटप करण्याचा महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाचा राज्यातील 71 लाख 54 हजार 738 एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांना लाभ होणार असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

राज्यात सुरु असलेल्या ‘ब्रेक द चेन’ या प्रक्रियेअंतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील विविध समाजघटकांसाठी मदतीचेजे पॅकेज घोषित केले होते. त्यामध्ये राज्यातील गरीब आणि गरजू लोकांना १५ एप्रिलपासून पुढे एक महिन्यासाठी शिवभोजन थाळीअंतर्गत मोफत जेवणाची व्यवस्था उपलब्ध करून दिली होती. ही मुदत आता आणखी एक महिन्यासाठी वाढवण्यात आली असून राज्यातील गरीब जनतेला दिनांक १४ जून २०२१ पर्यंत योजनेअंतर्गत मोफत जेवणाची सुविधा उपलब्ध होईल. अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिनांक १४ मे २०२१ रोजी यासंबंधीचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘ब्रेक द चेन’ प्रक्रियेअंतर्गत राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवभोजन थाळीच्या राज्याच्या प्रतिदिन इष्टांकामध्येही दीडपट वाढ करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *