ताज्याघडामोडी

भारतात 70 कोटींपेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण; न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टमध्ये दावा

नवी दिल्ली – भारतात कोरोनाची लागण आणि त्यातून झालेल्या मृत्यूच्या आकडेवारीवरून वाद सुरू आहेत. विविध ठिकाणी सरकारी आकडे आणि प्रत्यक्ष आकड्यांमध्ये फरक असल्याचे रिपोर्ट समोर आले. त्यातच आता आपल्या एका रिपोर्टमध्ये न्यूयॉर्क टाइम्सने भारतातील कोरोनाची लागण आणि त्यामुळे झालेल्या मृत्यूवर धक्कादायक दावा केला आहे.

अधिकृत आकडेवारीनुसार, देशात कोरोनामुळे 2.69 लोक प्रभावित झाले आहेत. तर 3 लाख 7 हजारच्या जवळपास लोकांचा कोरोनाने बळी घेतला. प्रत्यक्षात परिस्थिती यापेक्षा वेगळी आहे. केवळ भारतातच नव्हे, तर जगात कोरोनाने होणाऱ्या मृत्यूचा आकडा प्रत्यक्षात 2 ते 3 पटीने अधिक असल्याचा अंदाज जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा लावला आहे.

त्यात भारतामध्ये कोरोनात मृत्यूची आकडेवारी प्रत्यक्षात अधिक असण्याची शक्यता जास्त आहे.

एमोरी विद्यापीठाच्या महामारी तज्ज्ञ संशोधक कायोका शियोडा यांनी सांगितले, की भारतात रुग्णालये कोरोनाबाधितांनी भरले आहेत. कोरोनामुळे प्रामुख्याने ग्रामीण भागांत कित्येक लोकांचा मृत्यू घरातच होत आहे. अशा प्रकारच्या मृत्यूंची अधिकृत आकड्यांमध्ये नोंद होत नाही. भारतात प्रयोगशाळा सुद्धा कमी आहेत. मृत्यूचे खरे कारण शोधणे कठीण असते. कोरोना महामारी येण्यापूर्वी सुद्धा भारतात प्रत्येक 5 मृतदेहांपैकी 4 मृतदेहांची वैद्यकीय चाचणी होत नव्हती.

कोरोनामुळे भारतात किती मृत्यू झाले, याची आकडेवारी गोळा करण्यासाठी द न्यूयॉर्क टाइम्सने तज्ज्ञांची मदत घेतली. भारतातील कोरोना महामारीला या तज्ज्ञांनी तीन भागांत विभागले. यात सामान्य परिस्थिती, वाईट स्थिती आणि अत्यंत वाईट स्थिती असे वर्गीकरण करण्यात आले. त्यांनी तयार केलेल्या रिपोर्टनुसार, सरकारने जी आकडेवारी जारी केली त्याहून कित्येक पटीने जास्त मृत्यू प्रत्यक्षात कोरोनामुळे झाले आहेत.

कोरोना परिस्थितीचा आढावा तज्ज्ञांनी घेतला. सरकारने कोरोना संक्रमणाची जी आकडेवारी नोंदवली. प्रत्यक्षात कोरोना संक्रमण फैलावण्याची गती 15 पटीने अधिक होती. संक्रमणामुळे होणारा मृत्यू 0.15% असल्याचे अधिकृत आकड्यांत म्हटले आहे. त्याचाच आधार घेऊन पाहिल्यास मृतांचा आकडा दुप्पट असल्याचे निदर्शनास आले. एक्सपर्ट्सच्या अंदाजानुसार, देशात 40.42 लोकांना कोरोना संक्रमण झाले असून त्यापैकी 6 लाख लोकांचा मृत्यू झाला.

भारतातील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यामुळे इतर 20 जण संक्रमित झाले आहेत. तसेच 0.30% लोकांचा मृत्यू झाला असे गृहित धरले, तर भारतात अधिकृत आकड्यांपेक्षा 5 पट अधिक मृत्यू प्रत्यक्षात झाले, असे म्हणता येईल. सेंटर फॉर डिसीज डायनामिक्सचे संचालक डॉ. रमनन लक्ष्मीनारायणन यांनी सांगितले, भारतात संक्रमण आणि मृत्यूच्या आकडे कमी मोजण्यात आले आहेत. त्यांनी अशा परिस्थितीत तीन विविध माध्यमातून मिळालेल्या आकडेवारीचा अभ्यास करून त्याचे विश्लेषण केले. त्यातून जवळपास 50-60 कोटी भारतीयांना कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे.

या परिस्थितीत नोंद असलेल्या प्रकरणांपेक्षा 26 पट अधिक संक्रमण असल्याचा अंदाज लावण्यात आला आहे. तसेच संक्रमणातून होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण 0.60% ठेवण्यात आले. देशातील कोलमडलेल्या आरोग्य यंत्रणेचा सुद्धा यात विचार करण्यात आला आहे. त्यानुसार, 70 कोटी भारतीयांना कोरोनाची लागण झाली, तसेच कोरोनामुळे 42 लाख भारतीय दगावले असा अंदाज आहे.

तज्ज्ञांनी भारतात कोरोना संक्रमण आणि मृत्यूचा अंदाज लावण्यासाठी सीरो सर्व्हेच्या आकड्यांची सुद्धा मदत घेतली. वेगवेगळ्या काळात ही आकडेवारी घेण्यात आली आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर बरे होण्यासाठी विशिष्ट अँटीबॉडी तयार होतात. त्याचा अभ्यास सीरो सर्व्हेमध्ये केला जातो. याले सकूल ऑफ पब्लिक हेल्थचे सहाय्यक प्राध्यापक डेन वीनबर्गर यांनी सांगितल्याप्रमाणे सीरो सर्व्हेच्या काही मर्यादा आहेत. पण, प्रत्यक्ष आकडेवारीचा अंदाज लावण्यासाठी ते खूप महत्वाचे आहेत.

सीरो सर्व्हे संक्रमण पसरवणाऱ्या आजारांवर लक्ष ठेवण्यासाठी केले जातात. आजाराविरुद्ध लढण्यासाठी किती जणांच्या शरीरात अँटीबॉडी तयार झाल्या त्याचा शोध यामध्ये घेतला जातो. भारतात कोरोनाकाळात तीनदा देशव्यापी सीरो सर्व्हे करण्यात आले. त्यातून कोरोनाच्या नोंदणी असलेल्या प्रकरणांपेक्षा सीरो सर्व्हेत अधिक रुग्ण दिसून आले.

सीरो सर्व्हेमध्ये समोर आलेल्या माहितीनुसार, अधिकृत आकड्यांपेक्षा प्रत्यक्षात कोरोना झालेल्यांची संख्या 13.5 ते 28.5 पटीने अधिक आहे. त्यातही ही आकडेवारी केवळ सर्व्हे करण्यात आले, तेव्हाची आहे. सीरो सर्व्हे केल्यानंतरच्या काळात कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली. मोठ्या संख्येने लोक संक्रमित झाले. डॉ. शियोडा यांच्या मते, सीरो सर्व्हेत सुद्धा कमी आकडेवारी आल्याची शक्यता आहे. कारण, संक्रमण झाल्याच्या काही महिन्यानंतर अँटीबॉडी असल्याचे निष्पन्न होते. अर्थात ज्यांनी लक्षणे नसलेल्या कोरोनावर नुकतीच मात केली, त्यांच्या शरीरात अँटीबॉडी सापडल्या नसतील. त्यामुळे, सीरो सर्व्हेत सापडलेल्या कोरोना संक्रमितांपेक्षा प्रत्यक्ष संख्या आणखी जास्त असू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *