गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

किरकोळ वादातून वकिलावर प्राणघातक हल्ला, साताऱ्यात सहाजणांवर गुन्हा दाखल

सातारा येथील वकील राममोहन खारकर (वय 37) यांच्यावर शाहूनगर चौकात रात्री साडेदहा वाजता सहाजणांनी गाडी अडवून केलेल्या प्राणघातक हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात शस्त्र्ाक्रिया करण्यात आली आहे.

साताऱयातील शाहूनगर येथे वास्तव्यास असलेले व सध्या अंबाजोगाई येथे न्यायाधीश असलेले चंद्रमोहन खारकर यांचे ते मोठे बंधू आहेत. रस्त्यातून बाजूला थांबा असे सांगितल्याच्या कारणातून हा हल्ला झाल्याचे समोर आले आहे.

ऍड. राममोहन खारकर हे जिल्हा न्यायालयात वकील म्हणून कार्यरत आहेत. ऍड. खारकर हे रात्री साडेदहा वाजता त्यांच्या कारमधून मोनार्क हॉटेल रस्त्याने शाहूनगरकडे जात होते. यावेळी रस्त्याच्या चढावर पाच ते सहा युवक थांबले होते. त्यावेळी ऍड. खारकर यांनी त्या युवकांना रस्त्यावरून बाजूला थांबा, असे सांगितले.

उलट संबंधित युवक त्यांच्या कारवर धावून आले. त्यामुळे ते कार घेऊन पुढे निघून गेले. मात्र, पाठीमागून दोन दुचाकी आल्या. त्या सहा युवकांनी खारकर यांच्या कारच्या पुढे गाडय़ा आडव्या लावल्या. त्यातील एका युवकाने लोखंडी रॉडने कारची काच फोडली. त्यानंतर त्यातील एका युवकाने ऍड. खारकर यांच्या उजव्या डोळय़ावर दगड मारला. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर संबंधित युवक कारची काच फोडून पसार झाले.

खारकर यांच्या तक्रारीवरून अनोळखी सहा युवकांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनीही या प्रकाराची गांभीर्याने दखल घेतली असून, जिथे हा हल्ला झाला तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. लवकरच हल्लेखोर हाती लागतील, असे पोलिसांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे हे अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *